
हिंदुस्थानात कार कंपन्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत, परंतु या कारच्या किमती खूपच जास्त असल्याने याकडे मध्यमवर्गीय लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. परंतु पुढील चार ते सहा महिन्यांत इलेक्ट्रिक कारच्या किमती पेट्रोल कार इतक्या स्वस्त होतील, असा मोठा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ते फिक्की हायर एज्युकेशन समिट 2025 च्या कार्यक्रमात बोलत होते.
हिंदुस्थानातील ऑटोमोबाइल सेक्टर येत्या काही महिन्यांत मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. ईव्ही कारमुळे केवळ इंधन आयात खर्च कमी होणार नाही, तर पर्यावरणालाही मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. केंद्र सरकार सातत्याने बॅटरी टेक्नोलॉजी, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि देशांतर्गत उत्पादनांवर भर देत आहे. त्यामुळे ईव्ही उत्पादनाचा खर्च कमी होत आहे. लवकरच इलेक्ट्रिक कार पेट्रोल कारच्या किमतीत पोहोचतील असे ते म्हणाले. सध्या हिंदुस्थानात दरवर्षी जवळपास 22 लाख कोटींचे इंधन आयात केले जाते, जे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार मानले जाते. जर इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात वापरात आली तर हा खर्च कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच हिंदुस्थानला आर्थिक आत्मनिर्भरतेची बळकटी मिळेल. ईव्ही उद्योगाचा विस्तार केवळ पर्यावरणासाठी नाही, तर रोजगारनिर्मितीसाठीही महत्वाचा टप्पा ठरेल. बॅटरी रिसायलिंग आणि स्थानिक उत्पादनातील गुंतवणूक देशाला जगातील इलेक्ट्रिक वाहनांचे केंद्र (ईव्ही हब) बनवले, असे ते म्हणाले. दरम्यान, पेट्रोल कार आणि ईव्ही कारच्या किमतीत मोठा फरक आहे. पेट्रोलकारची किंमत 5 ते 6 लाखांपासून सुरुवात हेते तर ईव्ही कारची किंमत 8 ते 9 लाखांपासून सुरू होते.
चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम
हिंदुस्थान सरकारकडून देशभरात चार्जिंग स्टेशन, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि ईव्ही इकोसिस्टम वेगाने उभारली जात आहेत. सध्या जगभरातील ऑटोमोबाइल उद्योग हा प्रचंड वाढत आहे. सध्या अमेरिकेचा ऑटोमोबाइल उद्योग 78 लाख कोटी, चीनचा 47 लाख कोटी आणि हिंदुस्थानचा 22 लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे, असे गडकरी म्हणाले.