
>>मंगेश वरवडेकर<<
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये नेतृत्व म्हणजे सिंहासन नव्हे, तर ते एक बसस्टॉप आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण तुम्ही त्याचा थोडासा विचार केलात तर तुम्हालाही जाणवेल की, हे एक बसस्टॉपच आहे. एखादा उतरतो, दुसरा चढतो आणि बस चालूच राहते! बसच्या खिडकीतून लोक हसत हसत हात हलवतात, पण चालकाचा चेहरा मात्र गंभीरच असतो. हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये गेल्या 25 वर्षांत कर्णधारांची जी यादी आहे ती पाहिली की आठवतं, आपल्या इथे लग्नाआधीच्या प्रेमकथांसारखे हे नेतृत्व असते. सुरुवात अगदी रोमॅण्टिक असते, शेवट मात्र थोडा कडू.
गेल्या अडीच दशकांत तुम्ही सौरभ गांगुलीपासून थेट रोहित शर्मापर्यंत कुणाचेही नाव घ्या. तुमच्यासमोर बसस्टॉपच उभा राहील. गेल्या आठवडय़ात रोहित शर्माचे वन डे कर्णधारपद काढून घेण्यात आले तेव्हा गेल्या 25 वर्षांतील कर्णधारांची कारकीर्द डोळय़ांसमोर उभी राहिली.
सुरुवात करावी तर सौरभ गांगुलीपासून. हा फलंदाजीतला दादा माणूस जेव्हा कर्णधार झाला तेव्हा टीम इंडिया सातवे आसमानपर होती. 2003 च्या वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दादागिरी चालता चालता राहिली. गांगुलीने आपली दादागिरी हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरात दाखवली. संघात चैतन्य संचारणाऱ्या या क्रिकेटनेत्याची सत्ता 2005 मध्ये अचानक गेली. कारण? ग्रेग चॅपलचे ‘ई-मेल युग’ आणि दादाची हट्टी वृत्ती. पण ज्या माणसाने टीमला डोळय़ात डोळे घालून लढायला शिकवलं, त्याला इतिहासातून काढता येत नाही.
कर्णधारपद गेलं, पण चाहत्यांच्या हृदयातून दादा उतरला नाही. आजही प्रत्येक बंगाली बाबूमोशॉय दुपारी मासे खाताना म्हणतो, ‘दादाच तर खरा कॅप्टन होता!’
दादा गेला आणि महेंद्रसिंग धोनी आला. शांत चेहऱ्यामागचे अस्सल डावपेच. धोनीने इतिहास रचला. दादाच्या तीन पावलं पुढे त्याने संघाला नेलं. त्याच्या नेतृत्वात टी-20 वर्ल्ड कप, आयसीसी वर्ल्ड कप आणि
चॅम्पियन्स ट्रॉफी अशी तीन-तीन जेतेपदे जिंकली. तो हिंदुस्थानी क्रिकेटचा सोन्याचा काळ होता.
पण 2017 मध्ये तो अचानक म्हणाला, अब बस! सगळे म्हणाले- स्वतःहून निर्णय घेतला.
पण निवड समितीला आधीच नवा ‘चेहरा’ हवा होता. धोनीने तरीही नंतरच्या विश्वचषकापर्यंत टीमसाठी खेळत राहून सिद्ध केलं, कर्णधारपद सोडलं म्हणजे सिंह शिकार करणे विसरत नाही. धोनीचे अचानक कसोटी सोडणं, मग वन डे नेतृत्व सोडणं, सारंकाही अनपेक्षित होतं.
धोनीनंतर त्याची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर सोपविण्यात आली. खरं सांगायचं तर, मैदानात विराट असला तरी संघाचे नेतृत्व धोनीच करत होता. पण धोनीने कोहलीलाही आपल्या मुशीत तयार केलं. कोहलीने नेतृत्वाबरोबर आपल्या बॅटची करामत दाखवत टेस्ट क्रिकेटमध्ये हिंदुस्थानला परदेशात जिंकायला शिकवले. तोच हिंदुस्थानचा आजवरचा सर्वात यशस्वी आणि महान कर्णधार आहे. त्या नेतृत्वाला अनेक लेअर्स आहेत. बॅटने प्रतिस्पर्ध्यांना फटकावणारा कोहली शब्दांत हरला. निवड समिती आणि बीसीसीआयशी ‘तू-तू, मैं-मैं’ झालं आणि ‘मला फक्त 90 मिनिट आधी सांगितलं,’ हे त्याचं वाक्य इतिहासात संस्मरणीय झालं. जणू एखाद्याला लग्नाआधी वरात निघाल्यावर कळलं की, वर बदललाय! कोहलीचे अचानक कर्णधारपद सोडणे धक्कादायकच होते, पण त्यात क्रिकेटपेक्षा अधिक राजकारणच होते. कोहली गेला आणि रोहित शर्माचा नेतृत्वोदय झाला. पण त्यादरम्यान अजिंक्य रहाणे, शिखर धवन, के. एल. राहुल यांनाही कर्णधारपदाची संधी मिळाली, पण तो डेप्युटीच राहिला. काळानं त्याला हळूच बाहेर ढकललं.
आणि आला हिटमॅन रोहित शर्मा. तो आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वाने चांगलाच हिट झाला. त्याने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीची मिठी मारली. त्याने संघाला अव्वल स्थानावर पोहोचवलं. 2023 मध्ये तो हिंदुस्थानला जगज्जेता करता करता राहिला. ते जगज्जेतेपद हुकल्यानंतर त्याने टप्प्याटप्प्याने टी-20 आणि मग कसोटी क्रिकेटला अलविदा केलं; पण त्याची एकच इच्छा होती की, 2027 चा वर्ल्ड कप खेळायचाय. तरीही बोर्डानं त्याच्याकडून वन डेचे नेतृत्व काढून घेतले. बीसीसीआयचा हा निर्णय अनेकांना पटला नाही.
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये हे असंच होतं, तू कितीही जिंक नाहीतर देशाला जिंकून दे, सत्तेची खुर्ची भाडय़ाचीच असते. ती दिवस संपले की सोडावीच लागते. टीम इंडियाचे कर्णधारपद हा काटेरी मुकुट आहे. काहींना ती एक पदवी भासते, पण ते एक भावनिक कर्ज आहे. जिंकताना सगळे सोबत उभे राहतात; पण एखादी मालिका गमावली की नवा कर्णधार हवाय, असा आवाज घुमू लागतो. काळ जसजसा बदलतो, तसाच नेतृत्वाचा चेहराही बदलतो.मात्र एक गोष्ट कायम राहते, हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये कर्णधार बदलतात, पण दबाव कधीच बदलत नाही. तो नेहमीच जसाच्या तस्साच असतो. काटेरी मुकुटासारखा. रोहितनंतर नव्या दमाचा शुभमन गिल आलाय. तो संघासाठी किती शुभ आहे आणि तो किती काळ दिल जिंकतोय, ते येणारी मालिका दाखवेलच. पण एक गोष्ट निश्चित आहे, कितीही यश मिळवा, जेतेपदे जिंका, कर्णधार नेहमीच बसस्टॉपवर उतरतो. बस पुढे निघून जाते. याचाच अर्थ हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये कर्णधार होणे सन्मानाची बाब असली तरी त्या खुर्चीवर बसणाऱ्याला नेहमी ठाऊक असते ही बस कधीही थांबणार नाही.