
‘आपल्या देशातील व्यवस्था दर्शवणारी तीन नाटके मला करता आली. कोणती व्यवस्था कुठे वळते आणि काय करते, हे नेमकेपणाने दाखवता आले. 1975 साली ‘सामना’ चित्रपटाचे लेखन विजय तेंडुलकर यांनी केले आणि त्या चित्रपटाची निर्मिती झाली. त्यातील ‘मारुती कांबळे’ हे पात्र त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले. काळानुसार दलित राजकारण आता बदलले आहे. देश स्वातंत्र्य करण्यास महात्मा गांधी यांनी प्रचंड कष्ट घेतले. अंगावरील एका कपड्यावर त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात लढा दिला. ही असामान्य बाब आहे. नंतर जन्मलेल्या लोकांनी त्यांनी स्वातंत्र्य कसे मिळवले, हे विचारणे योग्य नाही,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’चे कोथरूडमधील ‘गांधी भवन’ येथे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, ‘साधना’ मासिकाचे संपादक विनोद शिरसाठ, डॉ. शिवाजी कदम, लक्ष्मीकांत देशमुख, सचिव अन्वर राजन, डॉ. एम. एस. जाधव, स्वप्नील तोंडे उपस्थित होते. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विनोद शिरसाठ यांनी डॉ. जब्बार पटेल आणि डॉ. मोहन आगाशे यांच्याशी संवाद साधला.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘माझे वडील रेल्वेमध्ये गार्ड म्हणून काम करत होते. सोलापूरसारख्या ठिकाणी घरात कोणतीही मोहन आगाशे संगीत पाश्र्वभूमी नव्हती. मात्र, घरासमोर गणपती उत्सव साजरा होत असे. त्या ठिकाणी एका नाटकात काम केले. अभिनेता होणे ही एक प्रक्रिया आहे. आरशासमोर बसून मेकअप करणे, संबंधित व्यक्तिरेखांचे कपडे घालणे यातून कलाकाराचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. वयाच्या 12व्या वर्षी नाटकबाबत माहिती मिळाली.’
‘विजय तेंडुलकर यांचे ‘माणूस’ नावाचे एक बेट नाटक लेखन मला खूप भावले. पुण्यात वास्तव्यास असताना बी. जे. मेडिकल महाविद्यालयात मी शिक्षण घेताना डॉ. मोहन आगाशे आणि डॉ. कुमार सप्तर्षी माझ्यासोबत शिक्षण घेत होते. त्या काळी सप्तर्षी हे चळवळीत काम करत असल्याने त्यांच्यात पुढारीपण होते, तर आगाशे यांच्याकडे कलागुण होते,’ असेही त्यांनी सांगितले.
बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये जब्बार पटेल हे नाटक करण्यामध्ये प्रसिद्ध होते. कॉलेजच्या कॅण्टीनमध्ये जब्बार यांच्याकडे सर्व विद्यार्थी नाटक शिकण्यासाठी गळ घालण्यासाठी जात. जब्बार शिस्तप्रिय होता. दिग्दर्शक म्हणून तो कडक भूमिका घेत असल्याने त्याची दहशत होती. त्याच्या सांगण्यानुसार मी काम करत गेलो. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकानंतर जो सामाजिक विरोध झाला, त्या काळात कसा समंजसपणे जब्बार वागला आणि मन स्थिर ठेवून परत नवीन नाटकास सुरुवात केली, हे मला समजत नव्हते.
मोहन आगाशे