Pune News – श्रीमंत महापालिकेचा काळ गेला – शेखर सिंह

एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत असल्याचा लौकिक होता; परंतु आता तो काळ राहिला नाही, असे महापालिकेचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शहर विस्तारत असताना प्रकल्प मोठ्या किंमतीचे हाती घ्यावे लागत आहे. एक एक प्रकल्प 100 ते 200 कोटींपर्यंत जात आहेत. त्यासाठी कर्जरोखे उभारावे लागत आहेत. सर्वत्रच कर्जरोखे उभारूनच प्रकल्प पूर्ण केले जात आहे, असे सिंह म्हणाले. तसेच, शहराची लोकसंख्या वाढत असताना पाण्याची मागणीही वाढली आहे. पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी मुळशी आणि ठोकरवाडी धरणांतील पाणी आरक्षित करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची निविदाप्रक्रिया पूर्ण करू शकलो नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने मुळशी धरणात 760 दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती.  2026 मध्ये काम पूर्ण होईल. शहराला 167 एमएलडी पाणी मिळेल. पवना बंदिस्त जलवाहिनीच्या प्रकल्पाची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच निविदाही प्रसिद्ध होईल. त्याचबरोबर ठोकरवाडी धरणातूनही 800 एमएलडी पाणी आणण्याचे प्रस्तावित आहे. त्यातील औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी 1.50 टक्के व उर्वरित 98.50 टक्के घरगुती पिण्याच्या प्रयोजनात वापरले जाणार आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार पुनर्स्थापना खर्च महापालिका भरण्यास तयार आहे. शहरासाठी 760 दशलक्ष लिटर पाणी आरक्षण मंजूर करण्यास शासन सकारात्मक आहे. आंद्रा धरणातून पाणी उचलण्यात येत आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनीच्या कामाला वेग दिला आहे.

सिंह म्हणाले, तळवडे येथे होत असलेला जैवविविधता प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प शहराची ओळख होईल. रस्ते मोठे करणे हा उपाय नसून, वाहनचालकांना शिस्त लावणे महत्त्वाचे आहे. कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई योग्य होती. मात्र, दुकाने हटविताना मनाला वेदना झाल्याचेही सिंह म्हणाले. भविष्यात वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर होईल, त्यामुळे चाकणपर्यंत मेट्रो होण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.”

शहरातील कामाचा अनुभव चांगला होता. नगरसेवक नसल्याने चांगल्या वाईट कामांची सर्व जबाबदारी माझी होती. त्यामुळे माझ्यावर आरोप-प्रत्यारोप होणे साहजिकच होते. तीन वर्षांतील कामाबाबत समाधानी आहे.
शेखर सिंह, मावळते आयुक्त, पिंपरी महापालिका.