
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात आंबिस्ते या गावात असलेल्या दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जीवन संपविले. त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेने खळबळ उडाली आहे.
देविदास परशुराम नवले( 15) इयत्ता दहावी व मनोज सिताराम वड (14) इयत्ता नववी अशी या विद्यार्थांची नावे आहेत. ते बिवळपाडा व दापटी ता. मोखाडाचे रहिवासी होते.
आंबिस्ते येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या संस्थेची दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून सुमारे 450 विद्यार्थी येथे निवासी शिक्षण घेत आहेत. बुधवार (दि.8) रोजी रात्रीचे जेवण झाल्यावर सर्व विद्यार्थी झोपून गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास येथील सुरक्षारक्षक शाळेच्या मागच्या बाजुच्या आवारात देखरेख करीत असताना त्याला काहीतरी झाडाला लटकत असताना दिसले. त्यानंतर तो झाडाच्या जवळ गेला असता दोन विद्यार्थी झाडाला गळफास घेऊन लटकत असल्याचे त्याला दिसले त्यानंतर त्याने शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व इतर शिक्षकांना उठवले. त्यांनीही गावातील पोलीस पाटील सरपंच यांना बोलावून वस्तूस्थिती दाखवली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस आल्यानंतर लगेचच त्यांना झाडावरून उतरवून वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण दोन्ही विद्यार्थी मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. विद्यार्थांनी जीवन का संपवले? याचे कारण समजू शकलेले नाही.






























































