नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे, फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे – हर्षवर्धन सपकाळ

मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. बिहार, गुजरात व पंजाब राज्याला केंद्राचे पॅकेज देणाऱ्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांवरील संकट पाहता केंद्र सरकारने राज्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज ही घोर फसवणूक आहे. पीकविमा काढलेला असतो, वीज कोसळून मृत्यू झाल्यास पैसे देण्याची तरतूद आहे, त्याचाही अंतर्भाव या पॅकेजमध्ये करण्यात आलेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी 5 लाख रुपये व कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून लावून धरली आहे. पंतप्रधान मुंबईत आले आणि मित्राच्या विमानतळाचे उद्घाटन करून गेले. पण महाराष्ट्रावर मोठे नैसर्गिक संकट कोसळलेले असताना त्यांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. जनतेत सरकारविरुद्ध तीव्र असंतोष आहे, तो पंतप्रधानांच्या दौऱ्यात दिसू नये म्हणून एक फसवे पॅकेज जाहीर केले पण सरकारचे पॅकेज म्हणजे राजा उदार झाला व हाती भोपळा दिला, असा प्रकार आहे.

निवडणुकांवर डोळा ठेवून विमानतळाचे उद्घाटन..

नवी मुंबई विमानतळ प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून अवधी आहे पण निवडणुकांवर डोळा ठेवून घाईघाईने उद्घाटन उरकण्यात आले आहे. याआधीही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आले, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटनही करण्यात आले, त्याचे काय झाले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, 100 स्मार्ट सिटी, कृषीवर आधारीत उद्योग याचे काय झाले, हे आपण पाहिले आहे.

महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का…

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. महिला अत्याचार वाढले आहेत, ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे. नाशिकला प्रभू रामाच्या वास्तव्याची ओळख आहे, काळाराम मंदिर आहे, अधात्मिक, सांस्कृतीक व ऐतिहासिक ओळख असलेल्या शहरात ड्रग्जचे रॅकेट चालते हे गंभीर आहे. ड्रग्जच्या काळ्याधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी त्याचे गुजरात कनेक्शन तपासले पाहिजे. एकट्या नाशिक शहरात 9 महिन्यात 44 खून झाले, हे अत्यंत गंभीर आहे. राज्यातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का, असा प्रश्न पडतो. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असताना राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालवला जातो, गुंडांना शस्त्र परवाना दिला जातो. अशा या वादग्रस्त गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची हकालपट्टी केली पाहिजे पण मुख्यमंत्री अशा लोकांना पाठीशी घालतात. रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचे जसे प्रमोशन झाले तसे योगश कदम यांचेही प्रमोशन होऊ शकते, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.

सरन्यायाधीशांवरील हल्ला मनुवादी कृत्य..

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टात झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पण हल्ला करणाऱ्याचे आडनाव जाणीवपूर्वक लपवले जात आहे. अफजल खान भेटीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करणाऱ्याचे नाव लपवले तसेच या हल्लेखोराचेही आडनाव लपवले जात आहे, हा हल्ला मनुवाद्यांचे कृत आहे. डोंबिवलीतही 72 वर्षांच्या काँग्रेस कार्यकर्त्याला जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले, त्याचे पुढचे पावले सरन्यायाधीशांवरील हल्ला आहे. वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर याचे लोण सर्वत्र पसरेल, अशी भीती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.