
स्वीडिश अकादमीने गुरुवारी साहित्यासाठीच्या नोबेल पारितोषिकाची घोषणा केली. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरीचे लेखक लास्जलो क्रास्नाहोर्काई यांना देण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लेखकांना हे पारितोषिक दिले जाते.
स्वीडिश अकादमीने पुरस्काराची घोषणा करताना सांगितले की, लास्जलो क्रास्नाहोर्काई यांच्या रचना अतिशय प्रभावशाली आणि दूरदर्शी आहेत. त्यांच्या लेखनात जगातील विनाश आणि भीतीच्या वातावरणातही कलेची ताकद स्पष्ट दिसते.
त्यांचा पहिला कादंबरी ‘सॅटानटॅंगो’ 1985 मध्ये प्रकाशित झाली होती. त्यामुळे त्यांची हंगेरीमध्ये लेखक म्हणून ओळख प्रस्थापित झाली. ही कादंबरी साम्यवादाच्या पतनाच्या थोडे आधीच्या काळात, हंगेरीतील ग्रामीण भागात असलेल्या एकाकी आणि गरिब शेतकऱ्यांच्या समूहावर आधारित आहे. त्यांच्या ‘सॅटानटॅंगो’ आणि ‘द मेलँकली ऑफ रेसिस्टन्स’ या दोन्ही कादंबऱ्यांवर चित्रपट बनवले गेले आहेत.
तर ‘ द मेलँकली ऑफ रेसिस्टन्स ’ ही कादंबरी एका छोट्या गावातील लोकांच्या संघर्षमय जीवनाभोवती फिरते आणि ती मानवी स्वभावातील दोष आणि गुण यांचे उत्कृष्ट चित्रण करते. ‘ सॅटानटॅंगो ’वर तर तब्बल सात तास लांबीचा चित्रपट बनवण्यात आला होता, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही खूप प्रशंसा मिळाली होती.
विजेत्याला 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजेच 10.3 कोटी रुपये, एक सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. जर पुरस्कार एकापेक्षा जास्त लोकांना मिळाला, तर बक्षिसाची रक्कम त्यांच्यात विभागली जाईल. हे पुरस्कार 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये प्रदान केले जातील. नोबेल अकादमीने यापूर्वीच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यक आणि साहित्य या क्षेत्रांसाठीचे विजेते जाहीर केले आहेत.