सामना अग्रलेख – इस्रायल-हमास शांतता करार, ट्रम्प यांचे घोडे!

प्रे. ट्रम्प यांच्या मानगुटीवर सध्या शांततेच्या नोबेलचे भूत बसले आहे. त्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. जगातील सगळी युद्धे, लढाया आपणच थांबवीत आहोत अशा फुशारक्या ते त्यासाठीच मारीत असतात. भारताचे पाकविरोधातील ऑपरेशन सिंदूरकाय किंवा इराणइस्रायल युद्ध काय, आपणच थांबविले हा त्यांचा दावा असतोच. आता इस्रायलहमास शांतता करार आपल्या मध्यस्थीमुळेच घडून आला, असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र शांतता कराराचा हा पहिला टप्पा किती यशस्वी होतो, किती काळ टिकतो, युद्धखोर इस्रायल किती काळ संयम राखतो असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे आज कोणाकडेच नाहीत. तूर्त तरी नोबेल पुरस्काराचे आपले स्वयंघोषित घोडे प्रे. ट्रम्प महाशयांनी आणखी पुढे दामटले आहे इतकेच!

इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ही घटना अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे. तसेच गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे, असेही ट्रम्प महाशयांनी म्हटले आहे. मागील दोन वर्षांपासून गाझा ज्या भीषण युद्धाच्या वणव्यात होरपळते आहे, ते पाहता हा करार टिकणार असेल तर तेथील जनतेसाठी तो खरंच मोठा दिलासा म्हणावा लागेल. इस्रायलने या दोन वर्षांत गाझा पट्टीत इस्पितळे, लहान मुले असा कसलाही विचार न करता अमानुष हल्ले केले. शेकडो लहान मुले त्यात मारली गेली. युद्धग्रस्तांच्या अन्नधान्याचे साठेही नष्ट केले. गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त करायचा या एकमेव हेतूने इस्रायलचे हे हल्ले सुरू होते. त्यामुळे त्या ठिकाणचे जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले होते. ते काही प्रमाणात का होईना, पण सुरळीत होण्यासाठी युद्ध थांबणे गरजेचे होते. ट्रम्प म्हणतात तसा करार खरंच झाला असेल तर गाझामधील शांततेला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे, असे म्हणता येईल. गाझामधील सर्वसामान्य जनताही सुटकेचा निःश्वास सोडू शकेल आणि हमासच्या ताब्यात असलेले इस्रायली ओलीसदेखील. कारण या पहिल्या टप्प्याच्या करारानुसार हमास इस्रायली

ओलिसांची सुटका

करणार आहे, तर इस्रायल आपले सैन्य गाझामधून एका निश्चित रेषेपर्यंत मागे घेणार आहे. हमासने बंधक बनवून ठेवलेल्या इस्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलने दोन वर्षांत जंगजंग पछाडले. बॉम्बच्या वर्षावाने संपूर्ण गाझा होरपळून काढले, बेचिराख केले. इतरही अनेक मार्ग वापरून पाहिले, परंतु आजही शंभरावर इस्रायली महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक ओलीस म्हणून हमासच्या ताब्यात आहेत. दोन वर्षे युद्ध करून आणि गाझाच्या मोठ्या भागात आपले सैन्य घुसवूनही या बंधकांची मुक्तता करणे नेतान्याहू यांना शक्य झाले नव्हते. हा मुद्दा त्यांच्यासाठी ‘गले की हड्डी’ बनला होता. त्यामुळे काही प्रमाणात गाझामधून सैन्य मागे घेऊन या ओलिसांची सुटका करून घेण्याशिवाय नेतान्याहू यांच्यासमोरही दुसरा पर्याय नव्हता. बहुधा त्यामुळेच ते ट्रम्प यांच्या दबावाखाली झुकले असावेत. आज ते ‘इस्रायलसाठी हा महान दिवस आहे,’ असे म्हणत आहेत ते ओलिसांच्या सुटकेचे हाडुक घशातून मोकळे होणार आहे म्हणून. तिकडे हमासलाही गाझा आणि तेथील जनता यापुढे युद्धात होरपळणे परवडणारे नव्हते. गाझाच्या काही भागांतून इस्रायली सैन्य हटविले जाणे, वीज, पाणी, वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यंत निकडीच्या जीवनावश्यक सोयी उपलब्ध होणे आणि इस्रायलच्या माऱयाने उद्ध्वस्त झालेला प्रदेश पुन्हा उभा करणे, हीच हमासचीदेखील

सर्वोच्च प्राथमिकता

होती. त्यातूनच ट्रम्प म्हणतात तसा करार झाला असावा. अर्थात काही महिन्यांपूर्वीही ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम घडवून आणला होता, परंतु इस्रायलने अचानक गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले होते. त्यामुळे ट्रम्प तोंडघशी पडले होते. आता पुन्हा ट्रम्प यांनीच इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाची घोषणा केली आहे. प्रे. ट्रम्प यांच्या मानगुटीवर सध्या शांततेच्या नोबेलचे भूत बसले आहे. त्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. जगातील सगळी युद्धे, लढाया आपणच थांबवीत आहोत, आपल्याच मध्यस्थीनंतर युद्धविराम होत आहेत, अशा फुशारक्या ते उठता बसता त्यासाठीच मारीत असतात. भारताचे पाकविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ काय किंवा इराण-इस्रायल युद्ध काय, आपणच थांबविले हा त्यांचा दावा असतोच. आता इस्रायल-हमास शांतता करार आपल्या मध्यस्थीमुळेच घडून आला, असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र शांतता कराराचा हा पहिला टप्पा किती यशस्वी होतो, किती काळ टिकतो, योजनेचे पुढचे टप्पे कसे मार्गी लागतात, युद्धखोर इस्रायल किती काळ संयम राखतो असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे आज कोणाकडेच नाहीत. तूर्त तरी नोबेल पुरस्काराचे आपले स्वयंघोषित घोडे प्रे. ट्रम्प महाशयांनी आणखी पुढे दामटले आहे इतकेच!