जाऊ शब्दांच्या गावा – केळी गोड म्हणून साल्यो खावंच्यो वे?

>> साधना गोरे

एखाद्या म्हणीची किंवा वाक्प्रचाराची कधी कधी टोटलच लागत नाही. त्यातलीच एक म्हण म्हणजे ‘आमचे हात केळी खायला गेले नाहीत’ किंवा ‘आम्ही काय केळं खायची का?’ या शब्दप्रयोगांमध्ये केळीचंच फळ का? आंबा, फणस, द्राक्षे का नाहीत? आता हे मान्य आहे की, केळी हे बारा महिने मिळणारं फळ आहे. शिवाय केळी आंबा-फणसाच्या तुलनेत स्वस्तही असतात, पण सर्व ऋतूंमध्ये मुबलक नि स्वस्तात उपलब्ध असणं या एवढय़ा एकाच कारणाने हात केळी खायला जात असतील का? तर तसं काही नाही. हे केळं खाणं म्हणजे काढली साल अन् खाल्लं केळं इतकं सोपं कोडं नाही बरं!

कृ. पां. कुलकर्णींनी व्युत्पत्ती कोशात म्हटलं आहे – ‘केळ’ हा शब्द संस्कृतमधील ‘कदली’ शब्दापासून आला. पाली भाषेतही ‘कदली’, गुजरातीत ‘केळ’, सिंधीमध्ये ‘केल्हो’, पंजाबी व हिंदीमध्ये ‘केला’ आणि बंगालीमध्ये ‘कला’ असे शब्द आहेत. ‘कदली’ हा शब्द संस्स्कृतमध्येच परकीय भाषेतून आला. तो मूळचा ऑस्ट्रोएशियाटिक आहे. तो ‘कली’ किंवा ‘टली’ असा असावा. त्याचे संस्कृतीकरण झाल्यानंतर मग त्याचे प्राकृत व अर्वाचीन रूप सिद्ध झाले.’ ‘कदली’वरून आठवलं. कर्दळीच्या झाडालाही रानकेळ म्हणतात. पूजेला केळीचे खुंट मिळाले नाहीत तर कर्दळीचे खुंटसुद्धा लावण्याची प्रथा आहे.

आता खायच्या ‘केळी’कडे येऊ. ‘आम्ही काय केळं खायची का?’ किंवा ‘आमच्या वाटय़ाला केळं’ यांसारख्या शब्दप्रयोगांमध्ये ‘केळ’चा अर्थ थोडं, क्षुद्र असा आहे. याचं मूळ समजून घेण्यासाठी आपल्याला कानडीतील ‘केळ’ शब्दाचा अर्थ पाहावा लागेल. कानडीमध्ये ‘केळ’ म्हणजे थोडे, क्षुद्र, हीन स्थिती, दुय्यम, असमर्थ, हलक्या प्रतीचा, खालचा भाग. आपल्या शेजारच्या कानडी भाषेतील हा अर्थ आणि मराठीतील केळ या फळाचा संबंध त्यांच्यासारख्या उच्चारांमुळे जोडला गेला. त्यामुळे मराठीतल्या या शब्दप्रयोगांमध्ये ‘खाणे’ शब्द आला. दुसरं म्हणजे कानडीत ‘केळे’ किंवा ‘केळगु’ या शब्दाचा एक अर्थ ‘खाली’ असा आहे. त्यावरून ‘केळ खाली/खाणे’ रूढ झालं असावं. तुमच्या लक्षात आलं का? कानडीच्या संगतीमुळे मराठीत वापरल्या जाणाऱ्या ‘केळ खाण्याचा’ अर्थ केळाचं फळ खाणं नव्हे !

या कानडी अर्थावरून मराठीत तयार झालेली आणखी एक म्हण आहे – ‘कागदी मेळ हातात केळ’. जमाखर्चाच्या कागदांवरसर्व हिशेब बरोबरअसून बरीच शिल्लक दिसते, पण प्रत्यक्षात तर हातात अजिबात पैसे शिल्लक राहिलेले नसतात. अशा वेळी किंवा एखादी गोष्ट दिसायला फायदेशीर किंवा आकर्षक, पण प्रत्यक्ष व्यवहारात नुकसानकारक ठरली तर ही म्हण वापरतात.

केळीचं फळं खायला किती सोपं ! भलंमोठं कलिंगड कापून खाताना त्याचे काप, बिया, साली यांचा पसारा होतो. डाळिंब खायचं तर खाण्यापेक्षा सोलण्यातच जास्त वेळ जातो. आंबा फळांचा राजा खरा, पण त्याचा रस गळून तोंड अन् हात चिकट होतात. केळीचा कसा आपला सुटसुटीत मामला. चहूकडून साल काढली की, गपक्यात खाऊन संपवता येतं. पुन्हा खाऊन झालं की, हातावर त्याची खूणसुद्धा राहत नाही. त्यामुळे एखादं सोपं काम करायला कुणी नकार देत असेल तर एक खास कोकणी म्हण आहे. ‘केळी खातल्याक तोंड दुकतवे?’ म्हणजे केळी खाणाऱ्याचे तोंड दुखेल काय? याच अर्थाची दुसरी एक म्हण आहे – ‘केळी खाताना गाल काही फाटत नाही’.

‘कुंथून कुंथून केळी खाणे’ किंवा ‘आजाऱ्याचं सोंग घेऊन केळी खाणे’ हेही सर्रास वापरले जाणारे वाक्प्रचार आहेत. सतत किरकिर करून किंवा रडून रडून आपल्या मनासारखं घडवून आणणाऱ्या व्यक्तीला उद्देशून हे शब्दप्रयोग वापरले जातात. एखाद्या गोष्टीचा अति फायदा घेऊ नये या अर्थाने वापरली जाणारी म्हण म्हणजे – ‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये’. अगदी याच अर्थाच्या कोकणी म्हणीत उसाच्या ऐवजी केळ आहे – ‘केळी गोड म्हणून साल्यो खावंच्यो वे?’

‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती’ या संत तुकारामांच्या ओळीचा अर्थ सांगणारी म्हण म्हणजे – ‘दर्याकिनारी केळी, मोडत नाही कदाकाळी’. समुद्रावरील अत्यंत सोसाटय़ाच्या वाऱ्यात माडाची झाडे पडतात. कारण ती वाकत नाहीत, पण केळीची झाडे वाकतात, त्या वाऱ्यास वाट करून देतात. त्यामुळेच त्या कधी पडत नाहीत. याचा अर्थ, संकटकाळी मनुष्य नम्र झाला असता त्यास संकटाची बाधा होत नाही.

[email protected]