
शहरात दहशतवादी हालचाली सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी गुरुवारी पहाटेपासून शहरातील कोंढवा, वानवडी, भोसरी, खडकीसह 18 ठिकाणी एकाच वेळी छापे टापून सर्च मोहीम राबविली. या छापेमारीत काही कागदपत्रे, डिजिटल पुरावे सापडले असून या कारवाया 2023मध्ये उघडकीस आलेल्या इसिसच्या दहशतवादी कटाशी जोडल्या गेल्याची शक्यता आहे.
2023मध्ये पुण्यात इसिसशी संबंधित दहशतवादी गट उघडकीस आला होता. या गटाने मुंबई, पुणे आणि गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्पह्ट घडवून आणण्याचा कट रचला होता. पोलीस तपासात या गटाने कोल्हापूर आणि सातारा जिह्यातील जंगलात बॉम्बस्फोटांची चाचणी केली, तसेच पुण्यातील कोंढवा भागात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले, हे उघड झाले होते.