
आपल्याला माहीत आहे की, सेवानिवृत कर्मचारी किंवा बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे सहकारी प्रेमाने निरोप देतात. यानिमित्ताने समारंभाचे आयोजन केले जाते. निरोप समारंभात शाल-श्रीफळ, भेटवस्तू देऊन ऑफिस सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव करण्यात येतो. सोशल मीडियावर निरोप समारंभाचा एक आगळावेगळा फोटो व्हायरल होतोय. त्यावर नेटिजन्स कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मध्य प्रदेशातील सिवनी जिह्यातील आयएएस अधिकारी संस्कृती जैन यांना खूप अनोखा निरोप देण्यात आला आहे. आयएएस अधिकारी संस्कृती जैन यांची भोपाळ येथे नियुक्ती होणार आहे. म्हणून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांना सोनेरी पालखीत बसवून नेले. संस्कृती जैन त्यांच्या दोन लहान मुलींसह पालखीत बसल्या आहेत. ढोल-ताशांच्या गजरात त्यांना अगदी खास निरोप देण्यात आला.