सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्याला SC/ST कायद्यानुसार अटक करावी, केंद्रीय मंत्री आठवले यांची मागणी

बी आर गवई हे दलित समाजाचे असल्यानेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. तसेच हल्लेखोराविरोधात एस,एसटी कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणीही आठवले यांनी केली.

गोव्यात पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, की ही घटना निंदनीय आहे. पहिल्यांदाच भारताच्या मुख्य न्यायाधीशावर असा हल्ला झाला आहे. भूषण गवई दलित समाजातून आहेत आणि त्यांचे वडील केरळ व बिहारचे राज्यपाल होते. त्यांनी शिक्षण घेतले आणि स्वतःच्या प्रयत्नांनी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. अखेरीस त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्याची संधी मिळाली. सवर्ण समाजातील अनेकांना हे पसंत आले नाही. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला केला.”

आठवले पुढे म्हणाले, की पंतप्रधानांनी या घटनेची निंदा केली आहे. मी देखील या घटनेची तीव्र निंदा करतो आणि माझी मागणी आहे की आरोपीला अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली जावी. गवई यांच्यावर हल्ला झाला कारण ते दलित आहेत. यापूर्वी भारताच्या मुख्य न्यायाधीशावर कधीही असा हल्ला झालेला नाही असेही आठवले म्हणाले.