हिंदुस्थानींनी अफगाणिस्तानमध्ये येऊन काम करावे, त्यांचे स्वागत; परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांचे आवाहन

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांनी हिंदुस्थानींना त्यांच्या देशात काम करण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांनी सांगितले की अफगाणिस्तानमध्ये वैद्यकीय, वीज आणि खाणकाम या क्षेत्रांत काम करण्यासाठी मोठ्या संधी आहेत आणि हिंदुस्थानी लोकांनी तेथे जाऊन काम करावे. त्यांचे तेथे स्वागत केले जाईल.

शुक्रवारी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुत्ताकी यांनी सांगितले की हिंदुस्थानी आणि अफगाणिस्तान यांच्यात एक व्यापारी समिती स्थापन करण्यावर सहमती झाली आहे. त्यांनी म्हटले, की भारतीय कंपन्या आणि लोकांनी अफगाणिस्तानात येऊन काम करावे. आमच्याकडे रुग्णालयांमध्ये डॉक्टर, खाणींमध्ये तांत्रिक तज्ज्ञ आणि वीज क्षेत्रात कुशल अभियंत्यांची मोठी गरज आहे. अफगाणिस्तान त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे.”

मुत्ताकी यांनी सांगितले की हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांना हे आश्वासन मिळाले की अफगाणिस्तान आपले राजनैतिक अधिकारी नवी दिल्लीत पाठवू शकतो, आणि हिंदुस्थानही काबूलमध्ये आपले राजनैतिक अधिकारी पुन्हा पाठवण्याचा विचार करत आहे. त्यांनी म्हटले, “गेल्या चार वर्षांत आमचे संबंध अधिक चांगले झाले आहेत, आणि माझी ही हिंदुस्थान भेट त्या दिशेने एक नवी सुरुवात आहे.