सामना अग्रलेख – स्टार्मर यांचा मुंबई दौरा!

भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारासंदर्भात करार झालाच आहे. त्यानुसार विविध क्षेत्रांत दोन देशांत उद्योग, व्यापार होत राहील. प्रश्न इतकाच आहे की, ब्रिटन आणि भारत हे एकमेकांचे स्वाभाविक भागीदार आहेत, पण या स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक भागीदाराने भारत संकटात असताना पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा दोस्ताना निभावला काय? ते भारताकडे व्यापारी म्हणून पाहतात. भारतातील लोकसंख्या, जमीन, वन संपत्ती त्यांना व्यापार करण्यासाठी हवीच आहे व आपणही ‘आत्मनिर्भर’, ‘स्वदेशी’चा नारा देत ब्रिटिशांसाठी पायघड्या घालीत आहोत. या वेळी अशा पायघड्या घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राची भूमी निवडली इतकेच!

ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर हे दोन दिवस मुंबईत होते. बऱ्याच काळानंतर एखाद्या राष्ट्राचे प्रमुख मुंबईत आले व त्यांनी शहरात मुक्काम केला. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या सरकारने मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एखाद्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष वगैरे भारतात आले की, ते पूर्वी हटकून मुंबईत येत. येथील प्रमुख लोकांना भेटत. त्यांच्या आगत स्वागताचे सोहळे होत. त्यांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन होत असे. मोदी यांनी त्यांच्या काळात परदेशी पाहुण्यांना मुंबईऐवजी गुजरातमध्ये उतरवायला सुरुवात केली. ट्रम्प, ओबामा, जपानचे पंतप्रधान, चीनचे राष्ट्राध्यक्ष वगैरेंची विमाने अहमदाबादला उतरवून गुजरातची महती गायली. अर्थात, गुजरातविषयी कोणाच्या मनात द्वेष असण्याचे कारण नाही. गुजरात आणि महाराष्ट्राचे एक जिव्हाळ्याचे नाते आहेच. ते नाते तोडण्याचा प्रयत्न मोदी-शहांच्या काळात झाला. मुंबईत बड्या परदेशी पाहुण्यांनी उतरू नये व त्याऐवजी गुजरातची पायधूळ झाडावी ही काही जणांची भूमिका संकुचित मनाची आहे. असे केल्याने मुंबईचे जागतिक महत्त्व घसरेल असे ज्यांना वाटत होते, त्यांच्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा मुंबई दौरा अभ्यासाचा विषय आहे. स्टार्मर हे मुंबईत आले. त्यांच्या स्वागतासाठी ‘मिंधे’ गटाच्या नेत्यांनी मुंबईभर फलक व होर्डिंग्ज लावली. जणू काही स्टार्मर हे बीकेसीतील सोहळ्यात मिंधे गटात प्रवेश करून विभागप्रमुखपदी नियुक्त केले जाणार होते. आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचे भान नसलेल्या लोकांचे हे कृत्य गमतीशीर आहे. स्टार्मर यांनाही ही

पोस्टरबाजी पाहून मजा

आली असेल. आपण सोडून गेलेल्या मुंबईचे कसे विद्रूपीकरण झाले आहे हेच त्यांनी अनुभवले असेल. आता स्टार्मर हे मुंबईत आले व मुंबईतच त्यांनी पंतप्रधान मोदींशी मसलत केली. मुंबईच्या राजभवनात पंतप्रधान मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधानांत चर्चा झाली व अनेक करारमदार झाले. नेहमीप्रमाणेच गुंतवणूक, संरक्षण, व्यापार, शिक्षण, विज्ञान अशा क्षेत्रांत करार झाले. ब्रिटनची नऊ विद्यापीठे भारतात त्यांचे कॅम्पस उघडतील. भारत आणि ब्रिटनमध्ये 4200 कोटी रुपयांचे ‘मिसाईल डील’ म्हणजे संरक्षणविषयक करार झाले. भारताच्या विकास यात्रेत ब्रिटनचा सहभाग सुरू झाल्याचे स्वागत पंतप्रधान मोदी यांनी केले. त्या बदल्यात स्टार्मर यांच्याकडून वदवून घेण्यात आले की, 2028 मध्ये भारत जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. अर्थात, ज्या मुंबईत दोन पंतप्रधानांत व्यापारी करारमदार सुरू होते, त्या महाराष्ट्रावर याक्षणी साधारण साडेनऊ लाख कोटींचे कर्ज आहे. मराठवाड्यात पुराचा जोर आहे व शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. चार महिन्यांत सवातीनशे शेतकऱ्यांनी एका प्रांतात आत्महत्या कराव्यात हे काही तिसऱ्या क्रमांकाच्या जागतिक अर्थव्यवस्थेला शोभत नाही. मुंबईत ज्या सरकारने स्टार्मर यांचे स्वागत केले ते सरकार भ्रष्ट मार्गाने, काळ्या पैशांच्या जोरावर निवडून आले आहे. त्यामुळे स्टार्मर म्हणतात त्याप्रमाणे भारत तिसरी जागतिक अर्थव्यवस्था कशी होणार? प्रे. ट्रम्प यांनी भारतावर जबरदस्त टॅरिफ लावले. त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. तेव्हापासून मोदी

‘स्वदेशी’ आणि ‘आत्मनिर्भरते’चा नारा

देत आहेत. अमित शहांनी तर इंग्रजीऐवजी हिंदीचाच पुरस्कार केला. देशात हिंदीच राहील अशी भाजपची भूमिका असताना ब्रिटनची नऊ विद्यापीठे भारतात कॅम्पस उघडत आहेत. आता मोदींच्या आत्मनिर्भर भारताला ब्रिटन आंतरराष्ट्रीय शिक्षण उपलब्ध करून देईल. स्टार्मर म्हणतात, ‘‘भारतात उच्च दर्जाच्या शिक्षणाची मोठी मागणी आहे.’’ याचा अर्थ गेल्या दहा वर्षांत भारतातला शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारासाठी आली व देशाची मालक बनली. या वेळीही ब्रिटिश प्रधानमंत्री स्टार्मर हे त्यांच्याबरोबर 125 पेक्षा जास्त उद्योगपतींचे शिष्टमंडळ घेऊन भारत दौऱ्यावर आले. स्टार्मर यांचा भारत दौरा हा मुंबईतच सुरू झाला व मुंबईतच संपला. मुंबईचे हे महत्त्व आहे. मुंबईत भारत सामावला आहे व मुंबई भारताची पोशिंदी आहे हे स्टार्मर यांना उमगले, पण भारतीय राज्यकर्त्यांना कधी समजणार? भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारासंदर्भात करार झालाच आहे. त्यानुसार विविध क्षेत्रांत दोन देशांत उद्योग, व्यापार होत राहील. प्रश्न इतकाच आहे की, ब्रिटन आणि भारत हे एकमेकांचे स्वाभाविक भागीदार आहेत, पण या स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक भागीदाराने भारत संकटात असताना पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा दोस्ताना निभावला काय? ते भारताकडे व्यापार म्हणून पाहतात. भारतातील लोकसंख्या, जमीन, वन संपत्ती त्यांना व्यापार करण्यासाठी हवीच आहे व आपणही ‘आत्मनिर्भर’, ‘स्वदेशी’चा नारा देत ब्रिटिशांसाठी पायघड्या घालीत आहोत. या वेळी अशा पायघड्या घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राची भूमी निवडली इतकेच!