लेख – भारतानेही ‘राष्ट्रीय हित’च जपायला हवे

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

ज्याप्रमाणे रशिया आपल्या युद्धखर्चाची पूर्तता करण्यासाठी केवळ आपल्या राष्ट्रीय आणि आर्थिक हिताला प्राधान्य देत आहे, त्याचप्रमाणे भारतानेदेखील प्रथम राष्ट्रहित(India First) हे धोरण ठेवावे. व्यावसायिक व्यवहारांमध्ये भावनिक संबंधांपेक्षा किंमत (Price) आणि सुरक्षितता (Security of Supply) याला महत्त्व द्यावे. आंतरराष्ट्रीय संबंधात राष्ट्रीय हितहेच सर्वोच्च असते. रशियाप्रमाणेच भारतानेही आपले आर्थिक हित जपण्यासाठी उपलब्ध असलेल्या स्वस्त पर्यायांचा वापर करण्यास कचरू नये.

रशियाकडून आलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या खरोखरच परस्परविरोधी (Contradictory) वाटतात आणि त्या रशियाच्या गुंतागुंतीच्या परराष्ट्र धोरणाकडे निर्देश करतात.

पहिल्या बातमीचा अर्थ : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे काwतुक केले. कारण भारताने अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करणे सुरू ठेवले. यातून रशियाला दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. भारताचे समर्थन : जागतिक स्तरावर भारतासारख्या मोठय़ा अर्थव्यवस्थेकडून मिळालेले आर्थिक आणि धोरणात्मक समर्थन  जाहीर करणे. त्यामुळे पाश्चात्त्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध कमी प्रभावी ठरतात हे दाखवणे.

आर्थिक हित : तेलाच्या विक्रीतून मोठा महसूल (Revenue) मिळवणे, जो युव्रेन युद्धामुळे आलेल्या आर्थिक दबावाला तोंड देण्यासाठी आवश्यक आहे. दुसऱ्या बातमीचा अर्थ : भारताने विनंती करूनही रशिया पाकिस्तानच्या ‘JF-17 थंडर ब्लॉक III’ लढाऊ विमानांसाठी RD-93MA इंजिनचा पुरवठा सुरू ठेवणार आहे. यामागे रशियाचे व्यावसायिक आणि भू-राजकीय हित आहे.

आर्थिक लाभ : हा इंजिन पुरवठा एक मोठा आणि महत्त्वाचा व्यावसायिक करार आहे. युक्रेन युद्धामुळे आलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाला शस्त्रास्त्रs विक्रीच्या कोणत्याही संधीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.

चीनसोबतचे संबंध : ‘JF-17’ हे विमान चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केले आहे. पाकिस्तानला इंजिन पुरवठा करणे म्हणजे रशिया आपल्या जवळचा मित्र असलेल्या चीनच्या संरक्षण उद्योगाला आणि त्यांच्या धोरणात्मक हिताला मदत करत आहे. पाश्चात्त्य देशांपासून दूर गेल्यानंतर चीन हा रशियासाठी सर्वात महत्त्वाचा भागीदार ठरला आहे.

या दोन्ही कृतींमध्ये रशिया आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये केवळ स्वतःचे राष्ट्रीय हित (National Interest) जपत आहे. रशियासाठी भारत अजूनही सर्वात मोठा आणि विश्वसनीय संरक्षण ग्राहक आहे. पुतीन भारताचे काwतुक करतात. कारण त्यांना भारताकडून तेल खरेदीचा आर्थिक फायदा (Oil Revenue) आणि भविष्यात शस्त्रास्त्रs विक्रीचा मोठा बाजार गमवायचा नाही. भारताचे काwतुक करून रशिया जुने संबंध जपण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी अमेरिका आणि युरोपकडून वाढलेल्या तणावामुळे, रशिया चीनच्या जवळ जात आहे. पाकिस्तानला इंजिन पुरवठा करणे हे चीनसोबतचे आपले धोरणात्मक सहकार्य वाढविण्याचे लक्षण आहे. या व्यवहारात भारताच्या संवेदनशीलतेपेक्षा चीनला खूश करणे आणि लगेच मिळणारा आर्थिक फायदा रशियाला अधिक महत्त्वाचा वाटत आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात ही ‘राष्ट्रीय हिताची दुहेरी चाल’ (Double Game of National Interest) म्हणून पाहिली जाते.

रशियाने पाकिस्तानच्या ‘JF-17 थंडर ब्लॉक III’ लढाऊ विमानांसाठी ‘RD-93MA’ इंजिन पुरवठा करण्याची भारताची विनंती फेटाळण्यामागे अनेक आर्थिक आणि धोरणात्मक (Geopolitical) कारणे आहेत. रशिया एक जागतिक शक्ती म्हणून आता केवळ एका जुन्या मित्रावर (भारतावर) अवलंबून न राहता आपल्या राष्ट्रीय हितांना आणि बदलत्या जागतिक समीकरणांना अधिक महत्त्व देत आहे.

गेल्या काही वर्षांत भारताने अमेरिका, फ्रान्स आणि इस्रायल यांसारख्या पाश्चात्त्य आणि गैररशियन स्रोतांकडून संरक्षण उपकरणे खरेदी वाढवली आहे. फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली आहेत आणि अमेरिकेसोबत जवळचे संरक्षण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये GE-HAL भागीदारीअंतर्गत जेट  इंजिनांच्या सहविकासावर चर्चा समाविष्ट आहे. ज्यामुळे भारताला AMCA स्टेल्थ फायटर आणि तेजस Mk-II सारख्या स्वदेशी कार्यक्रमांमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करताना प्रवृत्त करेल. त्यामुळे रशियाला आपल्या सर्वात मोठय़ा आणि ऐतिहासिक संरक्षण ग्राहकावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज वाटत आहे. पाकिस्तानला पुरवठा करून रशिया भारताला एक संदेश देत आहे की, त्यांच्याकडे पर्यायी बाजारपेठा आहेत.

जर रशियाने RD-93MA चा पुरवठा थांबवला तर चीन JF-17 मध्ये आपले स्वदेशी बनावटीचे ‘ए-13’ इंजिन बसवेल, ज्यामुळे रशियाला हे बाजार कायमचे गमवावे लागेल. त्याऐवजी, रशिया पुरवठा सुरू ठेवून बाजारातील आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहे आणि आर्थिक लाभ मिळवत आहे.

क्षमतेत वाढ : RD-93MA हे इंजिन जुन्या आवृत्तीपेक्षा जास्त जोर (Thrust) आणि उत्कृष्ट कार्यक्षमता देते. या इंजिनामुळे JF-17
ब्लॉक III ची लढाऊ क्षमता (Combat Capability), विशेषतः उंचीवरील (Hot-and-High Altitude) उड्डाणांमध्ये, लक्षणीयरीत्या वाढेल. त्यामुळे पाकिस्तानला भारतीय हवाई दलाच्या विरोधात आपली हवाई क्षमता वाढवता येईल.

भारत सध्या रशियाकडून सवलतीच्या दरात (Discounted Price) स्वस्त तेल विकत घेत आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघाने यावर विरोध दर्शविला असला तरी भारताने आपल्या राष्ट्रीय आर्थिक हिताचे रक्षण केले आहे.

जर अमेरिका किंवा इराण, आखाती देश (Gulf Nations) यांसारखे अन्य देश रशियापेक्षा कमी किमतीत तेल पुरवठा करण्यास तयार असतील तर भारताने नक्कीच त्यांच्याकडून तेल खरेदी करून आपले आर्थिक हित जपले पाहिजे.

[email protected]