
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पार कोलमडून पडला आणि देशोधडीला लागला आहे. महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचे सध्या सावट असताना महायुतीच्या दोन मंत्र्यांचा परदेश दौरा आहे. वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे सध्या दुबईच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. तर मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे येत्या 14 ऑक्टोबरला स्वीडनच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
माणिकराव कोकाटे गुपचूप रवाना
रमी प्रकरणामुळे कृषी खाते गमवावे लागलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक कल्याण मंत्री हे खाते दिले आहे. या खात्यातील त्यांचा हा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी माणिकराव कोकाटे हे दुबई व कतारच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत क्रीडा खात्याचे आयुक्त व अन्य अधिकारी आहेत. या दौऱ्याचा खर्च शिवछत्रपती क्रीडा संकुलामार्फत (पुणे) करण्यात येणार आहे.
नितेश राणेंसोबत तिघांची वर्णी
मंत्री नितेश राणे हे 14 ते 19 ऑक्टोबर या काळात स्वीडनमधील स्टॉकहोमच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्यासोबत मेरीटाईम बोर्डाचे तीन अधिकारीही स्वीडनचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यामध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप. पी. तसेच मेरीटाईम बोर्डाचे निमशासकीय सदस्य अभिजित ब्रह्मनाथकर आणि प्रशासकीय अधिकारी अजयकुमार सर्वगौड आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आणि परदेश दौरे
विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये चांगले काम करणाऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी दिली जाणार असल्याची घोषणा मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ समित्यांच्या उद्घाटन सोहळय़ात केली होती. पण त्यामुळे या दोघांना परदेश दौऱ्याचा पोलिटिकल क्लिअरन्स मिळाला असावा असे सांगण्यात येते. पण माणिकराव कोकोटे आणि नितेश राणे यांनी कोणती चांगली कामगिरी केली, असा प्रश्न मंत्रालयीन अधिकारी खासगीत विचारत आहेत.