मस्तच! खात्यात पैसे नसतानाही पेमेंट होणार, ‘भीम यूपीआय’ने आणले यूपीआय सर्कल फिचर

हिंदुस्थानात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात असून डिजिटल पेमेंटला आणखी सोपे बनवण्यासाठी ‘भीम यूपीआय’ने एक अनोखे फिचर आणले आहे. या फिचरचे नाव ‘यूपीआय सर्कल’ असे आहे. या फिचरमुळे यूपीआय खात्यात एक रुपया नसतानाही डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे. यावर कोणत्याही प्रकारचे व्याज नाही किंवा शुल्क द्यावे लागणार नाही.

यूपीआय सर्कल फिचर हे विश्वासावर आधारित डिजिटल फिचर आहे. कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या मित्रांना तुमच्या बँक खात्यातून पेमेंट करण्याची मुभा मिळू शकेल. यासाठी तुम्हाला परवानगी द्यावी लागेल. तुम्ही तुमच्या खात्यातून समोरच्या व्यक्तीला किती रुपयांपर्यंत पैसे वापरण्याची मर्यादा देऊ शकता, हे तुम्हाला ठरवावे लागेल. प्रत्येक यूपीआय व्यवहारासाठी तुमची मंजुरी आवश्यक आहे की नाही, हा पर्यायसुद्धा तुम्ही निवडू शकता. एकदा तुम्ही परवानगी दिली की, तुमच्या जवळची व्यक्ती किंवा मित्र त्याच्या यूपीआयमधून त्याच्या खात्यात पैसे नसतानाही तो 22 हजार रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतो. हे पैसे तुमच्या खात्यातून वजा होतील.

कशी आहे प्रक्रिया?

भीम अ‍ॅप लॉगइन करा. होम सर्कलवर यूपीआय सर्कल पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. कोणाला पेमेंट करण्याची परवानगी द्यायची त्या व्यक्तीला अॅड करा. यासाठी त्याचा पह्न नंबर आणि यूपीआय आयडी किंवा क्युआर कोड स्पॅन करावा लागेल. किती रुपयांपर्यंत परवानगी द्यायची ही रक्कम निश्चित करा. प्रत्येक व्यवहाराला तुमच्या मंजुरीची आवश्यकता द्यायची की नाही हे तुम्ही ठरवा. तुमचा यूपीआय पिन टाकून सबमिट बटनवर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र त्याच्या खात्यात पैसे नसताना पेमेंट करू शकेल.