अहिल्यानगरमध्ये पैशाच्या वादातून नातवाने केली आजीची हत्या, आरोपीला पोलीस कोठडी

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. पैशाच्या वादातून नातवानेच आजीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सचिन सुरेश मैंदड असे आरोपी नातवाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिरी गावातील किसनबाई छगन मैंदड (75) या वृद्ध महिलेची 6 ते 8 में दरम्यान अज्ञात इसमाने मारहाण करून हत्या केली होती. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकण्यात आला होता. याप्रकरणी मयत किसनबाई यांची मुलगी छाया हरीश्‍चंद्र खोसे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान किसनबाई यांचा नातू सचिन यानेच त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मयत किसनबाई यांनी त्यांच्या नावावर असलेली दोन गुंठे जागा 12 लाख रुपयांना विकली होती. त्या रकमेतून त्यांनी सचिन आणि चैतन्य मैंदड या दोन्हीही नातवांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिले होते तर उर्वरित 1 लाख 80 हजार रुपये मिरी येथील एका बँकेत फिक्स डिपॉझिट केले होते. या डिपॉझिटचा वारस चैतन्य सुरेश मैंदड असे नमूद केले होते. याच कारणावरून आरोपी सचिनच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यातूनच त्याने 6 मे रोजी आजीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळून टाकला.