
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये 6.59 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता खरेदी केली आहे. ‘अलिबाग’ फेज 2 प्रकल्पांतर्गत हाऊस ऑफ अभिनंदन लोढाकडून तीन भूखंड खरेदी केले. हे भूखंड एकूण 9,557 चौरस फूट आहेत. यासाठी अमिताभ यांनी 90 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क आणि 39.58 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजले आहे. याच परिसरात क्रिकेटपटू विराट कोहली यांची मालमत्ता आहे. त्यामुळे अमिताभ हे विराटचे शेजारी बनले आहेत. अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला 83 वा वाढदिवस आहे. तर अमिताभ यांनी 7 ऑक्टोबरला ही मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांनी वाढदिवसाचे हे गिफ्ट स्वतःला दिल्याचे बोलले जात आहे. अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली. अनेक चाहत्यांनी बंगल्यासमोर केक कापून वाढदिवस साजरा केला.