
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे बंद पडलेले फेसबुक खाते पुन्हा एकदा सुरू झाले आहे. अखिलेश यादव यांचे फेसबुकवर 8 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु, त्यांचे खाते शुक्रवारी सायंकाळी ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर सपाच्या आयटी टीमने कोणताही वेळ न दवडता मेटाला याची माहिती दिली होती. मेटाने शनिवारी हे खाते पुन्हा एकदा सुरू करण्यात आले.
सेबेस्टियन लेकॉर्नू पुन्हा एकदा फ्रान्सच्या पंतप्रधानपदी
फ्रान्सचे राष्ट्रपती इम्युनल मॅक्रॉन यांनी सेबेस्टियन लेकॉर्नू यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे. लेकॉर्नू यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, राष्ट्रपतींनी लेकॉर्नू यांना पुन्हा एकदा सरकार बनवणे आणि बजेट तयार करण्याची परवानगी दिली. फ्रान्समध्ये आलेले राजकीय संकट आणि आर्थिक संकटावर मात करण्यासाठी राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला आहे.
15 ऑक्टोबरला जपानला मिळणार नवा पंतप्रधान
साने ताकाइची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरणार असून 15 ऑक्टोबरला त्यांची निवड केली जाणार आहे. तीन दशकांपासून जपानच्या संसद सदस्य म्हणून त्या काम करत आहेत. 64 वर्षीय साने ताकाइची एलडीपीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. तसेच त्या नारा प्रांतातील पहिल्या व्यक्ती आहेत. जी आता पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. आपल्या संपूर्ण कारकीर्दमध्ये केवळ एकदा पराभव पत्करावा लागला आहे. तर त्यांनी 10 वेळा संसद सदस्य म्हणून विजय मिळवला आहे.
पाकिस्तानात पोलीस प्रशिक्षण सेंटरवर हल्ला, 13 ठार
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका पोलीस प्रशिक्षण सेंटरवर आत्मघातील हल्ला करण्यात आला असून यात 7 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. तसेच सहा दहशतवादी ठार झाले आहेत. हा हल्ला डेरा इस्माइल खान जिह्यातील रट्टा कुलाची पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये करण्यात आला. या हल्ल्यात 13 पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाले आहेत.
कोल्ड्रिफ कफ सिरपवर दिल्लीतही घातली बंदी
कोल्ड्रिफ कफ सिरपवर आता दिल्लीतही बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला असून या औषधाची विक्री आणि डिस्ट्रिब्यूशनवर बंदी घालण्यात येत आहे, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशात 20 हून अधिक मुलांचा हे औषध प्यायलाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोल्ड्रिफ बनवणाऱ्या श्रीसेन फार्मा पंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अटक करण्यात आली असून छिंदवाडाच्या एका कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यास राजस्थानमध्ये अटक
राजस्थानच्या इंटेलिजन्सने पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्यास अटक केली आहे. मंगत सिंह असे अटक करण्यात आलेल्या हेराचे नाव असून तो अलवरचा रहिवासी आहे. मंगत पाकिस्तानच्या दोन नंबरसोबत गेल्या वर्षभरापासून संपर्कात होता. तो अलवर लष्कर पँटमधील लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत होता. या बदल्यात त्याला मोठी रक्कम मिळत होती, असे पोलिसांनी सांगितले.