
दिवाळीचा सण अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा उजळल्या आहेत. पुणेकरांनी दिवाळीच्या खरेदीसाठी ‘वीकेण्ड’चा मुहुर्त साधल्याने आज (दि. ११) लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, कुमठेकर रोड, रविवार पेठे गर्दीने फुलून गेला होता. कपडे, दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, विद्युतमाळा, आकाशकंदील खरेदी करण्यात नागरिक व्यक्त होते. गतवर्षीच्या तुलनेत साहित्याच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
यंदाच्या दिवाळीला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. अवघ्या पाच ते सहा दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने बहुतांश पुणेकर शनिवार, रविवारी खरेदीसाठी घराबाहेर पडले. त्यामुळे लक्ष्मी रोड, मंडई, तुळशीबाग, रविवार पेठ, एफसी रोडवर सकाळपासूनच गर्दी केली होती. मंडई परिसरात असलेल्या पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये पूजा साहित्य खरेदी करण्यात पुणेकर व्यस्त होते. तर, लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोड परिसरातील साड्यांच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी पाहायला मिळत होती.
तुळशीबागेतदेखील शृंगार साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. रविवार पेठेसह अन्य भागांत घरगुती सजावटीचे साहित्य खरेदी करताना अनेकजण दिसत होते. मोठे आणि छोट्या आकाराचे आकाशकंदील खरेदी करताना नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत होता. तसेच, मातीच्या पणत्या, मेणपणत्या, रांगोळी आणि रांगोळीमध्ये वापरात येणारे विविध रंग खरेदी करण्यात महिला व्यस्त होत्या. मिठाई खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. गर्दीमुळे मुख्य पेठांमधील वाहतूक विस्कळीत झाली होती. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, मंडई, शनिपार परिसरात कोंडी झाली होती. शहरातील विविध भागांमध्ये सध्या फटाक्यांचे स्टॉल उभारण्याचे काम सुरू आहे. तर, काही ठिकाणी स्टॉल पूर्ण तयार झाले असून, फटाक्यांची विक्रीदेखील सुरू झाली आहे.