सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलीसच असुरक्षित

>> मंगेश हाडके
पोलीसच असुरक्षित झाल्याचे चित्र पिंपरी- चिंचवडमध्ये निर्माण झाले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत पोलिसांवर 13 हल्ले झाले आहेत. ऑ नड्युटी पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. वाहतुकीचे नियमन करताना तसेच सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर हल्ला होत आहे. पोलीसच सुरक्षित नसल्याने सामान्यांचे काय? असा प्रश्नही केला जात आहे.

वाहतुकीच्या व्यवस्थापनापासून मंत्र्यांच्या सुरक्षा, शहर, गाववस्त्यांवर गस्त, किरकोळ चोरट्यांपासून मोठमोठ्या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस कार्यरत असतात. गुन्हेगारी रोखण्यासह कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस सदैव तत्पर असतात. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, कारवाईदरम्यान, काही मुजोर नागरिक पोलिसांशी हुज्जत घालतात. काहीजण पोलिसांवर हात उचलण्यासह धमकीही देतात. त्यामुळे समाजाची सुरक्षा करणारे पोलीसच सुरक्षित नाहीत. पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर 6 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला वाहने आडवी लावून अडथळे निर्माण करणाऱ्या टोळक्याला पोलिसाने जाब विचारला असता, टोळक्याने पोलिसावर कोयत्याने वार केले. तर, 6 ऑक्टोबर रोजी दुपारी बावधन येथे चांदणी चौकात नाकाबंदी सुरू असताना कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली.

पोलिसांनी तडीपार केलेले गुन्हेगार परवानगी न घेता, शहराच्या हद्दीत येतात. त्यांच्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांनी हल्ले केल्याच्या सर्वाधिक घटना आहेत. हे गुन्हेगार पोलिसांना थेट जिवे मारण्याची धमकी देतात. वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालून त्यांच्या कामात अडथळा आणून मारहाण केल्याच्या घटना शहरात घडत आहेत. याचबरोबर पोलिसांना मारण्याची, नोकरी घालविण्याची, वर्दी उतरविण्याची धमकी देणे, वरिष्ठांकडे, राजकारण्यांकडे तक्रार करण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी 24 तास पोलीस सज्ज असतात. मात्र, पोलिसांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. चालू वर्षात आतापर्यंत तब्बल 13 घटना घडल्या आहेत. यापूर्वी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की च्या घटना घडत होत्या. आता थेट मारहाणीचेही प्रकार घडू लागले आहेत. पोलिसांवरच गुन्हेगार हात उचलू लागल्याने सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बड्या धेंडांचा ‘इगो’ येतो आड

दुचाकीस्वार तसेच आलिशान कारमधून येणाऱ्या बड्या धेंडांकडून पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार घडतात. स्वतः वाहतूक नियमांचे उल्लंघन करायचे आणि वाहतूक पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारल्यास त्यांचा ‘इगो’ दुखावतो. पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची बाब त्यांना सहन होत नाही. मग एखाद्या पुढाऱ्याला फोन लावण्यासह मोठमोठ्या ओळखी सांगितल्या जातात. तरीही, पोलीस रीतसर कायदेशीर कारवाई करण्यास गेल्यास त्यांच्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ करण्याबरोबरच मारहाण करण्यापर्यंत मजल जाते.

महिनानिहाय घटना

जानेवारी      3
फेब्रुवारी      1
मार्च          0
एप्रिल        2
मे            3
जून          0
जुलै          2
ऑगस्ट      1
सप्टेंबर       1
एकूण      13