तयार फराळाच्या ऑर्डरमध्ये दुपटीने वाढ

>> विवेक पानसे

व्यस्त दैनंदिन जीवनामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याने दिवाळीनिमित्त तयार फराळ खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने आवडीच्या पदार्थांची ऑर्डर देण्यामध्ये नागरिक व्यस्त असून, मोतीचूर लाडू, अनारसे, करंजी, चकली, चिवड्याला सर्वाधिक मागणी आहे.

दिवाळी म्हटलं की, फराळाचे पदार्थ हे आपसूकच आले. पूर्वी महिला फराळाचे पदार्थ हे घरच्या घरी तयार करायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांत घरगुती फराळ तयार करण्याची संख्या घटू लागली आहे. तसेच, ग्रामीण भागात तर महिला आपले नातेवाईक किंवा शेजारपाजारी फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी मदतीला जायच्या. मात्र, शहरी भागात अनेक महिला या व्यवसाय किंवा नोकरीमध्ये व्यस्त असल्याने त्यांना फराळाचेपदार्थ तयार करणे शक्य होत नाही. तसेच, उत्पन्नाची साधने वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांत तयार फराळाचे साहित्य खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

सध्या शहरातील विविध दुकानांमध्ये फराळाचे तयार पदार्थ वर्षभर मिळतात. मात्र, मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. तसेच, परदेशात फराळ तयार करणे कठीण असल्याने परदेशात स्थायिक झालेल्या हिंदुस्थानी नागरिकांकडूनदेखील मोठ्या प्रमाणावर तयार फराळाच्या ऑर्डर प्राप्त होत आहेत, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट अॅण्ड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या ऑर्डरमध्ये वाढ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. काही उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दिवाळीच्या सणाचे औचित्य साधले असून, घरोघरी अल्पदरात फराळ उपलब्ध करून दिला आहे. तर, काहींनी मोफत फराळ वाटप केले आहे. त्यामुळे फराळाच्या व्यावसायिकांना त्याचा फायदा झाला आहे, असे डॉ. सरपोतदार यांनी सांगितले.

साडेचार हजारांपेक्षा अधिक व्यापारी

गृहउद्योगही तयार फराळ विक्रीच्या व्यवसायात उतरले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे साडेचार हजारांपेक्षा जास्त व्यापारी सध्या तयार फराळविक्रीचा व्यवसाय करत आहेत. डिलिव्हरी अॅपमुळे फराळ घरपोच पोहचवणे सोपे झाले आहे, असेही डॉ. सरपोतदार म्हणाले.