विज्ञान रंजन – प्रवाळांचे ‘जग!’

>> विनायक

दसरा झाला. आता तरी पाऊस ‘सीमोल्लंघन’ करून परतीच्या प्रवासाला लागला असावा. तसे त्याचे हिमालय ओलांडून तिबेटपर्यंतचे सीमोल्लंघन पहिल्यांदाच झालंय. तरीही अनेक नैसर्गिक कारणांमुळे तो हिंदुस्थानी द्वीपकल्पात रेंगाळतोय. आता मात्र शेतकऱ्यांची दया येऊन त्याने काढता पाय घ्यावा आणि पुढच्या वर्षी वेळेवर आगमन करावे. दिवाळी उंबरठ्यावर असताना सणासुदीच्या दिवसात त्यावर ‘पाणी’ पडायला नको.

सणासुदीवरून आठवण झाली ती दागदागिन्यांची. सोनं, चांदी, प्रवाळ (पोवळं) किंवा हिरे या दागिने घडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे आपल्या पृथ्वीची देणगी. भूगर्भात दडलेल्या अनेक धातू आणि इतर मौल्यवान वस्तूंपैकी दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचे मोल अधिक. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची दुर्मिळता. या वस्तू सर्वत्र प्रचंड प्रमाणावर मिळत असत्या तर त्याचे अप्रूप वाटलेच नसते. पुठल्याशा कथानकातल्या नगरीत ‘सोन्याचे दगड’ असल्याच्या कल्पनारम्य प्रतिमा असतात. एवढय़ा प्रमाणात सोनं सापडत असते आणि कदाचित अग्निजन्य खडक दुर्मिळ असते तर त्याचेच ‘दागिने’ घडवले गेले असते. तसेही शंख-शिंपले, कवडय़ा यांचे दागिने बनतातच.

प्रवाळ किंवा पोवळंसुद्धा त्याचे मणी तयार करून माळ बनवण्यासाठी किंवा अंगठीत जडवण्यासाठी वापरले जाते. केशरी रंगाचं पोवळं दिसतंही छान. त्याला पावित्र्याचा सांस्पृतिक संबंध असतो, तर आयुर्वेदात ‘प्रवाळभस्म’ हे महत्त्वाचे औषध मानले जाते.

एवम्गुणविशिष्ट प्रवाळ किंवा पोवळं कसे तयार होते? तर हे कवचासारखे पोवळं शिंपल्यातल्या नैसर्गिक मोत्यांप्रमाणेच समुद्रात आणि समुद्राकाठी वाढते. आता ‘वाढते’ म्हटले तर सजीव असणार हे उघडच आहे. जगात ठिकठिकाणी प्रवाळांच्या (कोरल) लांबच लांब वसाहती (रीफ) आहेत. प्रवाळाचे सजीव ‘अपृष्ठवंशीय’ म्हणजे पाठकणा नसणाऱ्या प्राण्यांची एक विशेष प्रजाती आहे. केवळ काही मिलिमीटर जाडीचे आणि काही सेंटिमीटर लांबीचे हे पॉलीप प्रकारचे जीव समुद्राकाठच्या खडकांवर किंवा समुद्राच्या तळाशीही वाढतात. त्यांचे अनेक जीवशास्त्रीय प्रकार आहेत. त्यांचे वैशिष्ट्य असे की, ते पॅल्शियम कार्बोनेट निर्माण करतात.

सागरकिनारी जे प्रवाळ खडक असतात ते त्यातूनच निर्माण झालेले असतात. फोटोसिंथेसिस किंवा हरितद्रव्य तयार करून झाडांची वाढ होते तशीच प्रवाळांचीही होते. उन्हामध्ये त्यांना ‘रंग’ मिळतो. सामान्यतः प्रवाळ किंवा पोवळी गडद केशरी रंगाचीच असतात, पण ‘ऑक्टोपॅव्हिलिया’ प्रकारची पोवळी निळ्या रंगाचीही असतात. त्यांची किंमत खूप असते. हेक्झॅपॅव्हेलिया प्रकारच्या ‘कोरल’चे अगदी समान स्वरूपाचे सहा थरही आढळतात.

प्रवाळांमध्ये काही अगदी कठीण, तर काही मऊ असतात. त्यांच्या 120 प्रजाती असून कोरल-रीफ किंवा प्रवाळ वसाहतींजवळ मासे भरपूर मिळतात. अशा ‘रीफ’पाशी आजकाल स्पुबा डायव्हिंगसारखे खेळही आयोजित केले जातात. कृत्रिम पद्धतीने प्रवाळांची आणि मोत्यांचीही निर्मिती होते. प्रवाळाचा व्यवसाय करण्यातून जगातल्या कितीतरी कोटी लोकांची उपजीविका होते.

माणसाच्या हव्यासापायी निसर्गाचा होणारा ऱहास प्रवाळ खडकांनाही त्रास देतो. काही वेळा पर्यटकांच्या चालण्याने, कुतूहलाने त्यांचा नाश केला जातो, परंतु जैविक निसर्गचक्रात प्रवाळांना फार महत्त्व आहे. समुद्रांतर्गत किंवा सागरकिनारी असणारे प्रवाळ खडक सुमारे 25 टक्के सागरी सजीवांचे वसतीस्थान असते.

प्रवाळखंड, कांदळवन किंवा तिवरांप्रमाणेच सागरी लाटांकडून होणारी जमिनीची धूप रोखतात. सागरी लाटांची सुमारे 97 टक्के ऊर्जा शोषण्याचे कार्य हे प्रवाळ खडक जिथे असतात तिथे होते. त्यामुळे किनारपट्टीचे संरक्षण होत असते.

पृथ्वीवरचे सर्वाधिक प्रवाळ खडक (रीफ) ऑस्ट्रेलियात ‘ग्रेट बॅरिअर’ म्हणून ओळखले जातात. अ‍ॅटलॅन्टिक समुद्रकिनारी मेसोअमेरिकन भागातही कोरल रीफ मोठ्या प्रमाणावर आढळतात. लाल समुद्रसुद्धा प्रवाळांचे मोठे वसतीस्थान आहे. हिंदुस्थानात अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, कच्छमधील पिरोटन येथे बऱ्याच प्रवाळ रीफ आहेत. महाराष्ट्रातही तळकोकणाच्या सागरकिनारी प्रवाळ सापडते. तामीळनाडूमध्ये पाल्कची समुद्रधुनी आणि गल्फ मॅनॉर येथेही प्रवाळांची पैदास होते.

असंख्य जैविक प्रजातींना आश्रय देणाऱ्या आणि ‘कोरल पॉलिप’मधून तयार झालेल्या ‘रीफ’ एकातून एक अशा वाढतच जातात. मात्र हवामान बदल, वाढते प्रदूषण, समुद्री पाण्याची आम्लता वाढ आणि माणसांचा अवास्तव वावर प्रवाळांना घातक ठरतो. लाखो वर्षांपासून सागरकिनारी वाढणाऱ्या या ‘जिवांचं’ रक्षण केले तरच ‘दागिन्यां’साठी पोवळी मिळतील.