5 जीनंतर आता 6 जीचा धमाका! एआयआधारित तंत्रज्ञान, मोठी फाईल अवघ्या काही सेकंदांत डाऊनलोड होणार

हिंदुस्थानात आता 5 जीनंतर 6 जीचा धमाका होणार आहे. 6 जीची चाचणी 2028 मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये एआयची भूमिका महत्त्वाची असेल.  दूरसंचार सचिव नीरज मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जी चाचणी दोन वर्षांनंतर सुरू होईल. एआय तंत्रज्ञान अधिक प्रगत असेल, पण या सेवेसाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

सध्या  एआयचा जमाना आहे. अनेक क्षेत्रांत एआयची क्रांती दिसून येत आहे. एआयच्या मदतीने 6 जी नेटवर्कचा स्पीड सर्वाधिक असेल. ही रेंज कमी-जास्त होणार नाही. एकाच स्पीडने रेंज मिळेल. 6 जी नेटवर्कमध्ये एआयआधारित एजेंटिक एआय तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलचा आवाज आणि त्याचा दर्जा चांगला असेल, तर इंटरनेटची गती इतकी असेल की, मोठय़ा जीबीच्या फाईल झटपट काही सेकंदांत डाऊनलोड होतील. 2028 पर्यंत तंत्रज्ञानात मोठा बदल अपेक्षित आहे. त्यामुळे आणखी स्पीड असण्याची शक्यता आहे.

इंडिया एआय मिशनसाठी सरकारने 1.25 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. सुरक्षित एआय संशोधन आणि स्टार्टअप्सना याआधारे मजबूत करण्यात येणार आहे. हिंदुस्थान लवकरच एआय आणि 6 जीमध्ये जागतिक पातळीवर मोठी भरारी घेणार असल्याचा दावा सचिव मित्तल यांनी केला.

200 कोटींच्या ऑनलाइन फसवुकीला आळा

इंटरनेट युगातील धोके ओळखून दूरसंचार विभागाने एआयआधारित सुरक्षा टूल तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. ऑनलाईन फसवणूक आणि संशयित व्यवहारांची छाननी यामुळे होते. या टूलच्या मदतीने आतापर्यंत 200 कोटी रुपयांची फसवणूक थांबवण्यात आल्याचे ते म्हणाले, तर 48 लाखांहून अधिक बोगस व्यवहारांना थांबवण्यात आल्याचे ते म्हणाले.