
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या इंडिया टुरिझम डेटा कम्पेंडियम अहवालानुसार, हिंदुस्थानात थांबून प्रवास करण्याचा ट्रेंड आला आहे. कमी वेळात अनेक ठिकाणी भेट देण्याऐवजी पर्यटक आता एका विशिष्ट ठिकाणी जास्त वेळ घालवत आहेत, जेणेकरून त्यांना स्थानिक जीवन, संस्कृती आणि अनुभवांचा चांगला अनुभव घेता येईल.
अहवालातून असे दिसून आले आहे की, 2024 मध्ये 3.09 कोटी हिंदुस्थानी परदेशात गेले आणि परदेशात राहण्याचा सरासरी कालावधीही 50 दिवसांपेक्षा जास्त झाला आहे. मध्य पूर्वेला भेट देणाऱ्या हिंदुस्थानींचे प्रमाण एका वर्षात 33 टक्क्यांवरून 36 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. अबू धाबी आणि हनोई ही पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत.
थायलंड सुट्टीसाठीचे पहिले ठिकाण
2024 मध्ये 42.52 टक्के हिंदुस्थानींनी व्हेकेशन घालवण्यासाठी परदेशात प्रवास केला. 92.9 टक्के हिंदुस्थानींनी सुट्टी घालवण्यासाठी थायलंडला पसंती दिली. 91.6 टक्के हिंदुस्थानींनी व्हिएतनामला पसंती दिली.
यूएईमधील अबू धाबी, व्हिएतनाममधील हनोई आणि इंडोनेशियातील बाली हे हिंदुस्थानच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले.
टॉप 10 देशांव्यतिरिक्त, जवळ जवळ 51 लाख हिंदुस्थानींनी न्यूझीलंड, पोर्तुगाल, पोलंड आणि उझबेकिस्तानसह नवीन ठिकाणी प्रवास केला.
अहवालानुसार, 2024 मध्ये टॉप-10 डेस्टिनेशन देशांमध्ये हिंदुस्थानींनी केलेल्या एकूण परदेश प्रवासात 71.2 टक्के वाटा होता, जो 2023 मध्ये गेल्या वर्षी 74.2 टक्के होता.




























































