
हिंदुस्थानच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने ‘सुलतान ऑफ जोहोर चषक स्पर्धे’त न्यूझीलंडचा 4-2 गोल फरकाने धुव्वा उडवित आपली विजयी घोडदौड कायम राखली. या लढतीत हिंदुस्थानसाठी अर्शदीप सिंग (दुसऱ्या मिनिटाला), पी. बी. सुनील (15 व्या), अराईजित सिंग हुंदल (26 व्या) आणि रोशन कुजूर (47 व्या) यांनी गोल केले. न्यूझीलंडसाठी गस नेल्सन (41व्या) आणि एदान मॅक्स (52 व्या) यांनी न्यूझीलंडकडून प्रत्येकी एक गोल केला.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला हिंदुस्थानने खाते उघडले. अर्शदीप सिंगने उजव्या बाजूने झपाट्याने आक्रमण करत गोलवर फटका मारला. न्यूझीलंडचा गोलरक्षक चेंडू अडवण्यात यशस्वी झाला, परंतु रिबाऊंडवर अर्शदीपने गोल साधला. पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला पी. बी. सुनीलने पेनल्टी कॉर्नरवर सुंदर फटका मारत हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी वाढविली. मग कर्णधार रोहितने हुशारीने केलेल्या पासवर सुनीलने सुरेख फटका मारत गोलजाळी गाठली. हा हिंदुस्थानचा चौथा पेनल्टी कॉर्नर होता. यापूर्वीचे तीन प्रयत्न न्यूझीलंडच्या बचावपटूंनी अडवले होते.
हुंदल आणि कुजूरने ठोकले निर्णायक गोल
दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला अराईजित सिंग हुंदलने जलद टर्न घेत तिसरा गोल केला आणि हिंदुस्थानची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. तिसऱ्या सत्रात न्यूझीलंडच्या गस नेल्सनने 41 व्या मिनिटाला गोल करून अंतर कमी केले, पण काही मिनिटांतच रोशन कुजूरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत हिंदुस्थानला 4-1 असे आघाडीवर ठेवत तीन गोलांचे अंतर कायम ठेवले. 52 व्या मिनिटाला एदान मॅक्सने न्यूझीलंडसाठी आणखी एक गोल केला आणि शेवटच्या काही मिनिटांत तणाव वाढवला, परंतु हिंदुस्थानी बचावफळीने मजबूत प्रदर्शन करत विजय निश्चित केला.