अपहरण झालेल्या 90 मुलींचा शोध; राहुरी पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान’ यशस्वी

>> राजेंद्र उंडे

हरविलेल्या आणि अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींना पुन्हा कुटुंबीयांच्या मिठीत आणण्यासाठी राहुरी पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या दीड वर्षात 90 मुलींचा शोध लावून त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले आहे. या मोहिमेमुळे राहुरी पोलिसांची संवेदनशीलता, चिकाटी आणि तपास कौशल्याचे कौतूक होत आहे.

17 जानेवारी 2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशनचा चार्ज घेत असतानाच, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी 17 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर 23 जानेवारी 2024 रोजी परत एकदा 17 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल होण्यासाठी आला. हा गुन्हा दाखल करत असताना जानेवारी 2024 मध्ये अपहरणाचे एकूण सहा गुन्हे दाखल झालेले असून, सहाही गुह्यांत 15 ते 17 वर्षे वयाच्या मुलींचे प्रलोभन दाखवून अपहरण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले व अशा प्रकरणांचे गांभीर्य व त्याचा समाजव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता, या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे ठरविले.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली. यात दहा बीट पथके आणि एक डीबी पथक कार्यरत होते. पथकांनी सोशल मीडिया, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, माहितीदारांचे नेटवर्क आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मुलींचा मागोवा घेतला. तपासादरम्यान अनेकवेळा पोलिसांना राज्याबाहेरही शोधमोहिमा राबवाव्या लागल्या. काही प्रकरणांत मुलींनी आपले नाव बदलले होते किंवा मोबाईल बंद केला होता. तरीही चिकाटीने शोध घेत त्यांना परत आणण्यात आले.

या घटना वाढण्याची कारणमिमांसा जाणून घेतल्यानंतर धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या. कधीकधी अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून, तर कधी-कधी चैनीच्या वस्तू, दुचाकी गाडय़ांवर फेरफटका मारणे, मोठय़ा शहरात नेऊन मौजमजा करू, पर्यटनस्थळी जाऊ, अशी प्रलोभने देऊन त्यांचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. राहुरी पोलिसांनी गेल्या नऊ वर्षांतील अपहरण झालेल्या 102 मुलींपैकी तब्बल 90 मुलींचा शोध लावून त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले.

उच्च घरातील एखाद्या मुलीचे अपहरण केले गेले, तर त्याची चर्चा गावाबरोबर जिल्हाभर गाजायची; परंतु गोरगरिबांच्या मुलीस फूस लावून पळवून नेले, तर त्यांना पोलिसांकडे तक्रारही करता येत नव्हती. मात्र, पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी मुलाचा तपास लावताना भेदभाव न केल्यानेच आज तालुक्यातील 90 मुलींचा ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत शोध घेण्यात यश मिळाले.

मोबाईलचा अतिरेकी वापर धोकादायक

तपासात असे आढळून आले की, अनेक अल्पवयीन मुली सोशल मीडियावरील बनावट प्रोफाइल आणि ऑनलाइन मैत्रीच्या जाळ्यात अडकतात. मोबाईलचा अतिरेकी वापर आणि पालकांचे दुर्लक्ष ही अनेक अपहरण प्रकरणांमागची मुख्य कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जागृतीसाठी विविध उपक्रम

राहुरी पोलिसांनी शाळा व सामाजिक संस्थांमध्ये जाऊन ‘मोबाईल शाप की वरदान?’, ‘सोशल मीडियाचा वापर’, ‘वाहतुकीचे नियम’, अशा विषयांवर जनजागृती केली. तसेच तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन करून दरवेळी सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांचा स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी सन्मान करण्यात आला.

तपासात मिळालेले धक्कादायक निष्कर्ष

काही प्रकरणांमध्ये अपहरण करणाऱ्यांना मदत करणाऱया 17 जणांना सहआरोपी म्हणून अटक करून न्यायालयीन कोठडी घेण्यात आली. यात वाहन उपलब्ध करून देणारे, लॉजमधील खोली देणारे आणि काही नातेवाईकांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.