दिवाळी फराळ- लाडू तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

दिवाळी फराळातील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे लाडू. लाडू करताना अनेकदा पाक नीट न झाल्याने, लाडवांची चव बिघडते. लाडू करताना पाक हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. पाकात थोडीही चूक झाली तर, मग लाडू करणे हे महाकठीण काम होते.

लाडू करताना काही गोष्टी ह्या लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. लाडू करताना पाक ओळखण्याची कला असते. ही कला एकदा ज्ञात झाली की, लाडू करणे सोपे होते.

दिवाळीत भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी या टिप्सचा वापर करा, वाचा

कोणत्याही लाडवाचा भाजा भाजताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप घेतल्यास कमी लागते व लाडू खमंग होतात व मऊ राहतात.

डिंकाचे लाडू करताना डिंक साजूक तुपात तळल्यावर वनस्पती तुपापेक्षा तूप कमी लागते व लाडूही खूप दिवस मऊ राहतात. डालडा घातल्यास लाडू थंड झाल्यावर डालडा गोठून लाडू घट्ट होतात.

दिवाळीचा फराळ अधिक दिवस टिकण्यासाठी या गोष्टी फाॅलो करा, वाचा

डिंकाचे लाडू गुळाच्या पाकात घालून वळताना थोडे थोडे मिश्रण ताटात काढून थंड झाल्यावर वळावेत म्हणजे पटापट वळता येतात. मिश्रण गरम असेल तर हाताला चिकटते व लाडू पटापट वळता येत नाहीत.

लाडवात घालावयाचे सुके खोबरे थोडे भाजून घालावे. खोबरे न भाजताच घातले तर खोबरे खवट झाल्यामुळे लाडवाची चव बदलते.

रव्याच्या लाडवाचा पाक जर जास्त कच्चा झाला व मिश्रण सुकले नाही तर थोडा पक्का पाक करून घालावा किंवा पाक पक्का झाला व लाडू वळताना भुगा0व्हायला लागला तर थोडा कच्चा पाक करून घालावा.

मेथीच्या लाडवात घालायचे मेथीचे पीठ 3-4 दिवस आधी तुपात भिजवून ठेवले तर मेथीचा कडूपणा कमी होतो.

दिवाळी फराळ- तुमच्याही करंज्या फसताहेत का, मग या टिप्स वापरून बघा, करंजी होईल खुसखुशीत

एकतारी पाक- पाक जाड झाल्यावर हाताचा अंगठा व पहिले बोट पाकात बुडवून एकमेकाला चिकटवावीत व उघडबंद करावीत. पाकाची बारीक तार धरून अर्धवट तुटल्यास एकतारी पाक झाला.

दोनतारी पाक- एकतारी पाकापेक्षा जास्त पक्का पाक होऊन पाकाची पक्की तार धरते व तार तुटत नाही. सलग 2-3 तारा येतात.

गोळीबंद पाक- दोनतारीपेक्षा जास्त पक्का पाक करून पाकाचा थेंब थंड पाण्यात टाकून बघावा. पाकाची कडक गोळी होते. पाकाची तार पाण्यात टाकल्यास तार कडक होते व हाताने कटकन तुटते.