मार्केटयार्डात माणुसकी हरवली ! हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ॲम्बुलन्स मिळाली नाही; एकाचा मृत्यू

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात सोमवारी मानवी संवेदनांना काळिमा फासणारी घटना घडली. शेतमाल खरेदीसाठी आलेल्या एका व्यापाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. तो जागेवर कोसळला; पण त्याला मदत मिळाली नाही. गणपती मंडळाची अॅम्ब्युलन्स बंद अवस्थेत होती, तर त्याला दुसऱ्या वाहनातून रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अखेर त्या व्यापाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे मार्केटयार्डात माणुसकी कुठेतरी हरवली, असे चित्र होते.

पुणे बाजार समितीच्या मुख्य गुलटेकडी बाजार आवारात दररोज शेतमाल खरेदी-विक्रीसाठी व्यापारी खरेदीदार, डमी व्यापारी, वाहनचालक आदी सुमारे वीस-पंचवीस हजार लोकांची ये-जा असते. या बाजारातील तरकारी विभागात सोमवारी (दि.13) एक व्यापारी शेतमाल खरेदीसाठी आलेले होते. त्यावेळी तरकारी विभागातील गाळा नंबर 568 लोहकरे यांच्या गाळ्यासमोर त्या व्यापाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. काही लोकांनी अॅम्ब्युलन्ससाठी प्रयत्न केले असता, उपलब्ध अॅम्ब्युलन्स चालकाविना पडून असल्याचे समोर आले. त्यानंतर ती व्यक्ती तब्बल 1 तास जागेवर पडली होती. बाजार समितीनेदेखील स्वतःच्या गाडीत त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्याची तसदी घेतली नाही. बाजारात दररोज शेतमाल खरेदी विक्रीसाठी पाच-दहा हजार वाहने येत असतात. यापैकी कोणीही त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी पुढे आला नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने बाजारात एका व्यक्तीचा नाहक जीव गेला. त्यामुळे मार्केटयार्डात माणुसकी कुठेतरी हरवली, असे चित्र होते.

सभापती बदलले की नवीन गाडी; समितीचा कारभार

बाजार समिती केवळ उत्पन्न वाढल्याचा ढोल बडवत असते. मात्र, गैरकारभार आणि चुकीच्या कामात सुधारणा करत नाही. संचालक मंडळाच्या सुमारे तीन वर्षांच्या काळात सभापती बदलल्यानंतर एक इनोव्हा आणि एक इलेक्ट्रिक अशा दोन वाहनांवर सुमारे 40 ते 50 लाखांचा खर्च केला. मात्र, बाजार घटकांसाठी एक अॅम्ब्युलन्स स्वतःच्या मालकीची घेता
आली नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

गणपती मंडळाची अॅम्ब्युलन्स बंद

जय शारदा गजानन मंडळाने बाजार आवारात आपत्कालीन व्यवस्था म्हणून वर्गणी काढून अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. सोमवारी या अॅम्ब्युलन्ससाठी फोन केला गेला. मात्र, या अॅम्ब्युलन्सला चालक नसल्याने बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चालकाविना अॅम्ब्युलन्स जागेवर पडून आहे.

” संबंधित व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. परंतु त्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यापुढील काळात गणपती मंडळाची रुग्णवाहिका चालवण्याची जबाबदारी बाजार समिती घेणार असून, चोवीस तास वाहनचालकाची नियुक्ती केली जाईल.
प्रकाश जगताप, सभापती, बाजार समिती, पुणे.