फडणवीसांसारखा गोंधळलेला, कन्फ्यूज मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही; संजय राऊत यांची टीका

लोकशाहीचे बळकटीकरण आणि पारदर्शक निवडणुकांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाला घेरले. या शिष्टमंडळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीसांसारखा गोंधळलेला, कन्फ्यूज मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला. ते गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

सर्वपक्षीय शिष्टमंडळावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, इतके कन्फ्यूज विरोधक मी माझ्या आयुष्यात पाहिले नाही. याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस हे सुद्धा असेच बोलायचे. तुम्ही जर पेशवाईची काही कागदपत्र चाळली, तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारी वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली हे दिसून येते. पेशवाईमध्ये जे साडे तीन शहाणे होती त्यातले नाना फडणवीस हे अर्धे शहाणे होते. फडणवीस त्यांच्याही पेक्षा कमी शहाणे मला दिसताहेत, अशी खरपूस टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले, फडणवीस वकील आहेत. भाजपचे पुढारी आहेत. म्हणून आम्ही त्यांना आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केले होते. त्यांच्याकडे जे मुद्दे आहेत ते त्यांनी आमच्याबरोबर येऊन निवडणूक आयोगापुढे मांडायला हवे होते. पण आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत, ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत. तुम्ही चोऱ्या करता, घोटाळे करता, बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता. मिस्टर फडणवीस, निवडणूक याद्यामध्ये घोटाळे आहेत हे पुराव्यासह दाखवण्यात कन्फ्यूजनचा विषय काय आहे?

देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला, कन्फ्यूज मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही. यांना कुणी वकील केले हे कळायला मार्ग नाही. नरेंद्र मोदींच्या मेहरबानीने जे देशातील मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यातले ते आहेत. ते कर्तुत्वावर मुख्यमंत्री झालेले नाहीत. जर कर्तुत्व असते तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासंदर्भात त्यांनी असे विधान केले नसते, असे राऊत म्हणाले. या पूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक निवडणूक आयोगाकडे वारंवार जाऊन भींतीवर डोके आपटून आलेले आहेत. यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणे, रेटून नेणे याच्या पलीकडे दुसरे काही जमत नाही, असेही राऊत म्हणाले.

सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे तमाशा! संजय राऊतांचा घणाघात, भाजप आणि दोन बगलबच्चे पक्ष घोटाळे करण्याची फॅक्टरी असल्याची टीका

याच विषयावर आम्ही दिल्लीतही मोर्चा काढला होता. मतदार याद्यांतील घोटाळे, ईव्हीएममधील घोटाळे या संदर्भात काढलेल्या मोर्चात 84 वर्षीय शरद पवार पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित होते. महाराष्ट्रातही हेच प्रश्न असून निवडणूक आयोगापुढे प्रश्न मांडताना शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे फडणवीस जरा अभ्यास करा, अन्यथा आपल्या वकिलीची डिग्री आम्हाला तपासावी लागेल, असेही राऊत म्हणाले.