
>> साधना गोरे
‘पैल तो गे काऊ कोकताहे, शपुन गे माये सांगताहे’ या ज्ञानदेवांच्या अभंगातील कावळा शुभवार्ता सांगणारा आहे, तर घागरीत दगड टापून तळाला गेलेले पाणी वर आणणारा आणि आपली तहान भागवणारा हुशार कावळाही आपण लहानपणी गोष्टीरूपात ऐकलेला असतो. मृताच्या दहाव्या दिवशी त्याच्या नावाच्या पिंडाला कावळा शिवतो की नाही यावरनं त्याच्या आत्म्यास मुक्तता मिळेल की नाही ही माणसानेच केलेली समजूत आपण अनुभवतो. कावळ्याची अशी कितीतरी रूपं आपल्याला चिरपरिचित आहेत.
‘कावळा’ या शब्दाविषयी पृ. पां. पुलकर्णी ‘व्युत्पत्ती कोशा’त म्हणतात, ‘संस्कृत ‘काक’, ‘काकाल’ ‘काकोल’ या शब्दांपासून ‘कावळा’ शब्द आला असावा. प्रापृत भाषेत ‘काक’, ‘काग’ अशी रूपं आहेत. पुढे प्रापृतमध्ये ‘काअ – व – ल्ल’ असा शब्द तयार झाला. यातल्या ‘ल्ल’ प्रत्ययांपासून मराठीत ‘ळा’ प्रत्यय आला. हा प्रत्यय मराठीतील ‘बगळा’, ‘बावळा’ या शब्दांमध्ये दिसतो. पुलकर्णींचे पुढील म्हणणे अधिक महत्त्वाचे आहे – ‘द्राविडी भाषेत कावळ्याला ‘काक / काग’ हा एकच शब्द आहे. संस्कृतमध्ये मात्र कावळ्याला निरनिराळे शब्द आहेत. त्यावरून द्राविडी भाषेतील शब्द हा मूळ शब्द असला पाहिजे.’
खूप भूक लागल्यावर ‘पोटात कावळे ओरडणे’ हा मराठीत सर्वाधिक वापरला जाणारा शब्दप्रयोग म्हणता येईल. याविषयी स्पष्टीकरण देताना पुलकर्णी म्हणतात, या शब्दप्रयोगातला ‘कावळे’ हा शब्द कानडी ‘कवळु’ म्हणजे भूक या शब्दाशी संबंधित आहे, पण पुंडलिक कातगडे यांच्या कन्नड – मराठी कोशात हा शब्द आढळत नाही. त्यांच्या कोशात ‘कवळि(ळे)’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ आहे मूर्च्छा, बेभानता, बेशुद्धी, तर ‘कवळिगे’ या शब्दाचा अर्थ आहे भिक्षापात्र, थाळी. तसेच ‘कावूर / कावर’ या शब्दाचा अर्थ आहे क्रोध, उद्रेक. कानडीतले हे तिन्ही शब्द भुकेशी संबंधित किंवा त्याचे परिणाम दर्शविणारे आहेत, तर इथं सांगायचा मुद्दा असा की, मराठीतले ‘पोटातले कावळे’ हे कानडी आहेत.
‘काकतालीय न्याय’ हा मराठीत आणि बऱयाच भारतीय भाषांमध्ये वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे. संस्कृतमध्ये कावळा ताडाच्या झाडाजवळ येणे व त्याच वेळी ताडाचे फळ त्याच्या डोक्यावर पडणे याप्रमाणे योगायोगाने लाभ किंवा हानी घडणे या अर्थी हा शब्दप्रयोग वापरतात. मराठीमध्येही एखादी गोष्ट आकस्मिकपणे घडणे याच अर्थी हा शब्दप्रयोग वापरला जातो, पण ती संस्कृतप्रमाणे आकस्मिक हानी किंवा लाभ या अर्थी नसून योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे, मग त्या इष्ट किंवा अनिष्ट कशाही असोत; बोलाफुलाला गाठ पडली या अर्थी योजतात. तामीळमध्ये या न्यायाला ‘कागदालीयम’ असं म्हटलं जातं.