
कोलंबोमध्ये सलग दोन सामने पावसामुळे रद्द झाल्याने हिंदुस्थानी महिला संघाला महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काहीसा दिलासा मिळाला आहे. लागोपाठच्या दोन पराभवानंतर दबावात असलेल्या टीम इंडियासाठी पावसामुळे उपांत्य फेरीच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.
मंगळवारी न्यूझीलंड व यजमान श्रीलंका यांच्यातील सामना याचबरोबर बुधवारी इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. ही स्थिती विशेषतः इंग्लंड आणि न्यूझीलंडसाठी थोडी दिलासादायक ठरली. कारण दोन्ही संघ त्यावेळी पराभवाच्या छायेत होते. मात्र हिंदुस्थानी सघांसाठीदेखील ही चांगली बातमी ठरली आहे. कारण आता या दोन्ही संघांवर विशेषतः न्यूझीलंडवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. न्यूझीलंडसाठी विश्वचषकातील आता पुढील प्रत्येक सामना हा ‘नॉकआऊट’ स्वरूपाचा बनला आहे. त्यांचे फक्त 3 गुण असून त्यांनी आतापर्यंत फक्त बांगलादेशला पराभूत केले आहे.
इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध जवळजवळ सामना गमावण्याच्या स्थितीत होता. त्यांचे पुढील सामने हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. इंग्लंडकडे सध्या 7 गुण आहेत आणि सेमी फायनलसाठी पात्र होण्यासाठी त्यांना उरलेल्या तीन सामन्यांत किमान एक विजय आवश्यक आहे.
हिंदुस्थानी संघाचा पुढचा सामना 19 ऑक्टोबरला इंदूरमध्ये इंग्लंडविरुद्ध, तर त्यानंतर नवी मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हिंदुस्थानला या दोन्हीपैकी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. जेणेकरून बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून सेमी फायनलचे तिकीट निश्चित करता येईल. इंग्लंडविरुद्ध विजय मिळाल्यास हिंदुस्थानचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला तरी इंग्लड आणि न्यूझीलंड सामन्याचा निकाल त्यांच्यासाठी निर्णायक ठरेल, परंतु इंग्लंडकडून पराभव झाल्यास न्यूझीलंडविरुद्धचा सामना ‘व्हर्च्युअल क्वार्टर फायनल’ ठरेल.
पाकिस्तानची ऐतिहासिक विजयाची संधी हुकली
दरम्यान, पाकिस्तानकडे इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजयाची सुवर्णसंधी होती, पण सततच्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. कर्णधार फातिमा सना हिने चार बळी घेत इंग्लंडला पावसामुळे 31 षटकांच्या सामन्यात 9 बाद 133 धावांवर रोखले होते. त्यानंतर डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार पाकिस्तानसमोर 113 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. सलामीवीर मुनीबा अली (9) आणि ओमायमा सोहेल (19) यांनी चांगली सुरुवात करून 6.4 षटकांत विनाविकेट 34 धावा केल्या होत्या, मात्र पावसामुळे पाकिस्तानची ऐतिहासिक विजयाची संधी हुकली.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने 50 षटकांत 6 बाद 258 धावा केल्या होत्या. निलाक्षिका डि’सिल्व्हा (नाबाद 55) आणि कर्णधार चमारी अटापट्टू (53) यांच्या फलंदाजीमुळे संघाने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. परंतु न्यूझीलंडचा डाव सुरू होण्यापूर्वीच आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाऊस आला आणि सामना रद्द करण्यात आला. परिणामी, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.