वेब न्यूज – फेसबुकने घडवले वडील व मुलीचे पुनर्मीलन

ब्रिटनमध्ये राहणारी 46 वर्षांची शार्लेट ही महिला तसे सामान्य जीवन जगणारी. दिवसभर काम करावे आणि संध्याकाळी घरी आल्यावर सोशल मीडियावर थोडासा निवांत वेळ घालवावा व मनोरंजन मिळवावे हे तिचे रोजचे आनंदाचे क्षण. मात्र तिचे हे रोजचे साधारण आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकणारा एखादा क्षण या सोशल मीडियामुळेच आपल्या आयुष्यात अचानक येईल याची तिला कल्पनादेखील नव्हती.

त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे शार्लेट आपले फेसबुक चेक करत होती आणि कधी नव्हे ते तिने मेसेजेसमधील स्पॅम/जंक फोल्डर उघडले. त्यात एक मेसेज आलेला होता ‘हाय. मी तुझा बाबा.’ मेसेज वाचून शार्लेट पूर्णपणे हादरून गेली. लहानपणी तिच्या आईने तिला तिचे वडील त्यांच्या घटस्फोटानंतर समुद्रात बुडून मेल्याचे सांगितले होते आणि शार्लेटनेदेखील त्यावर विश्वास ठेवला होता. तिच्या आईने दुसरे लग्नदेखील केले होते. मात्र आता तब्बल चार दशकांनी हा मेसेज पाहून ती सुन्न झाली होती. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव होते रे विन्सेंट. त्याच्या प्रोफाइलवर असलेला फोटोदेखील तिला परिचित वाटत होता. लहानपणी कुठेतरी हा चेहरा पाहिल्याचे तिला धूसर आठवत होते. दुर्दैवाने म्हणा किंवा तिच्या आईच्या दुराग्रहामुळे ते तिला कधी भेटू शकले नाहीत. मात्र एक दिवस त्यांनी ‘ग्रेट ब्रिटिश मेन्यू’ कार्यक्रमात भाग घेतलेल्या शार्लेटला बघितले आणि एक क्षणात तिला ओळखले. त्यानंतर त्यांनी तिला अनेकदा संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण दरवेळी त्यांचा मेसेज जंक फोल्डरमध्ये जाऊन पडत होता. मात्र आता त्यांचे भाग्य उजळले आणि शार्लेटला जंक फोल्डर उघडण्याची बुद्धी झाली. त्या दिवशी त्यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि शेवटी चार दशकांनी त्यांच्या भेटीचा योगदेखील जुळून आला.

स्पायडरमॅन