ठसा- पंकज धीर

>> दिलीप ठाकूर 

एक प्रचंड लोकप्रिय भूमिका एक ओळख मिळवून देते, पण त्यानंतर काळ कितीही पुढे सरकला तरी सतत त्या कलाकाराचा त्याच भूमिकेसह उल्लेख होत राहतो. पंकज धीर यांच्या निधनाचे धक्कादायक वृत्त आले तेव्हा पटकन त्यांनी 1988 साली साकारलेल्या बी. आर. चोप्रा दिग्दर्शित बी. आर. फिल्म निर्मित ‘महाभारत’ या लोकप्रिय पौराणिक दूरदर्शन मालिकेतील कर्ण या बहुचर्चित व्यक्तिरेखेचा उल्लेख झाला. या मालिकेला तब्बल 37 वर्षे होऊनदेखील पंकज धीर यांची ओळख अतिशय प्रभावीपणे कर्ण साकारलेला अभिनेता अशीच राहिली हे विशेष उल्लेखनीय आहे.

खरे तर बी. आर. चोप्रा यांनी पंकज धीर यांची निवड महाभारतातील अर्जुन या व्यक्तिरेखेसाठी केली होती. लेखी करारदेखील झाला होता, पण पंकज धीर आपली मिशी उतरवून घेण्यास तयार नव्हते म्हणून ती भूमिका पंकज धीर यांचा मित्र फिरोज यांस मिळाली. एका मोठय़ा चित्रपट निर्मिती संस्थेच्या मालिकेतील काम आपल्या हातातून निसटून जाणे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणारे असते. पंकज धीर यांच्याकडे काही महिने काम नसल्याने निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या कार्यालयातून कामासाठी चकरा मारणे आले. त्यात बी. आर. चोप्रा यांनीच ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील कर्ण या व्यक्तिरेखेसाठी पंकज धीर यांची केलेली निवड योग्य ठरली. पंकज धीर यांचे व्यक्तिमत्त्व या भूमिकेसाठी योग्य ठरले आणि गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील ‘महाभारत’ मालिकेच्या सेटवर पंकज धीर अधिक आत्मविश्वासाने वावरू लागले.

पंकज धीर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. वयाच्या 68 व्या वर्षी कर्करोगाने पंकज धीर यांचे निधन झाले. 80 च्या दशकाच्या पूर्वार्धात पंकज धीर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि अजय शर्मा दिग्दर्शित ‘मेरा सुहाग’ या चित्रपटात नायकाची भूमिका साकारली. हिंदी चित्रपटातून छोटय़ा-छोटय़ा भूमिका साकारत असतानाच दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर रविवारी सकाळी 9 वाजता प्रक्षेपित होणाऱ्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. चित्रपटाबरोबरच मालिकेतूनही भूमिका साकारणे पसंत केलेल्या कलाकारात पंकज धीर होते. त्यांनी साकारलेला कर्ण इतका व असा लोकप्रिय झाला की, उत्तर भारतातील कर्णाल या गावी कर्णाच्या मंदिरात पंकज धीर यांची प्रतिमा पुजली जाते.

पंकज धीर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना ‘बॉम्बे फॅण्टसी’ (1983) या आपल्या देशातील पहिल्या धाडसी आशयावरील चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाची निर्मिती ‘शान’ या चित्रपटाने नावारूपास आलेल्या मजहर खान यांची होती. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट बराच काळ कैचीत पकडला. पंकज धीर यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आणि तो चित्रपट, मालिका यातून फळला.

त्यांनी ‘सुखा’ (हा त्यांचा पडद्यावर आलेला पहिला चित्रपट. यात अगदी छोटीशी भूमिका होती), ‘पांडव’, ‘सडक’, ‘सोल्जर’, ‘जीवन एक संघर्ष’ अशा अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या. अब्बास मुस्तान दिग्दर्शित ‘बादशाह’ या चित्रपटात मुख्यमंत्री गायत्री (राखी गुलजार) यांच्या शरीर रक्षकाची, तर हृदय शेट्टी दिग्दर्शित ‘जमीन’ या चित्रपटात पायलटची भूमिका साकारली. पौराणिक मालिकांमधून पंकज धीर यांची अतिशय उत्तम रीतीने वाटचाल झाली. ‘देवो के देव महादेव’ ही मालिका विशेष उल्लेखनीय. त्याशिवाय ‘द ग्रेट मराठा’, ‘राजा की आयेगी बारात’, ‘कानून’, ‘दस्तक’ अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. ‘चंद्रकांता’ या मालिकेत त्यांनी जुनागढचा महाराजा शिवदत्त साकारताना जिभेवर सर्पदंश करण्याची त्यांची शैली काही वेगळीच होती. या वाटचालीत वेशभूषाकार अनिता यांच्याशी विवाह केला. त्यांना निकितन हा मुलगा आणि निकिता ही मुलगी अशी अपत्ये आहेत. कालांतराने ती मोठी झाली. निकितन अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. पंकज धीर यांनी अभिनेत्री कृतिका सेनगर हिच्याशी त्याचा विवाह केला.

पंकज धीर यांनी ‘माय फादर गॉडफादर’ (2014) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पंकज धीर यांनी आपला मित्र गुंफी पटेलसोबत अभिनय प्रशिक्षण संस्थाही स्थापन केली.

[email protected]