
हिंदुस्थानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि निवड समिती यांच्यात निर्माण झालेल्या वादावर अखेर बीसीसीआयचे निवड समिती अध्यक्ष अजीत आगरकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आगरकर म्हणाले, “जर शमी पूर्णपणे फिट असता, तर तो नक्कीच संघात असता. पण सध्या तो पूर्ण तंदुरुस्त नाही, त्यामुळे निवड शक्य झाली नाही. अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौयासाठी संघात स्थान न मिळाल्याने शमीने सोशल मीडियावर निवडकर्त्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. शमीने म्हटले होते, मी रणजी ट्रॉफीत बंगालसाठी खेळलो आहे, म्हणजे मी फिट आहे. निवडकर्त्यांनी स्वतःहून माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. खेळाडूचं काम फिट राहणं आहे, रिपोर्ट पाठवणं नाही. या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आणि चर्चेला शमी विरुद्ध निवड समिती असा रंग आला. एका वृत्तवाहिनीच्या वर्ल्ड समिटमध्ये बोलताना आगरकर म्हणाले, मला माहित नाही शमीने सोशल मीडियावर काय लिहिलं, पण माझा फोन नेहमी खेळाडूंसाठी उपलब्ध असतो. शमी हा हिंदुस्थानसाठी उत्कृष्ट गोलंदाज आहे. जर तो पूर्ण फिट असता, तर इंग्लंड दौरा असो वा ऑस्ट्रेलिया मालिका, तो संघात नक्की असता. दुर्दैवाने तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
तसेच शमीसोबत माझी अनेकदा चर्चा झाली आहे. मला मथळे तयार करायचे नाहीत. काही सांगायचं असेल तर मी थेट त्याला फोन करतो. गैरसमज दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संवाद.’’