न्यू हॉलीवूड – अमेरिकेचा चेहरामोहरा दाखवणारी रोड मूव्ही

>> अक्षय शेलार

न्यू हॉलीवूड चळवळीच्या परंपरेत वळणबिंदू ठरलेला ‘इझी रायडर’ अमेरिकन ड्रीमवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या, स्वातंत्र्याच्या शोधात निघालेल्या दोन बाइकर्सची ही कहाणी.

‘इझी रायडर’ हा चित्रपट न्यू हॉलीवूड चळवळीच्या परंपरेत एक वळणबिंदू ठरला. 1969 मध्ये प्रदर्शित झालेला डेनिस हॉपर दिग्दर्शित आणि पीटर फॉण्डा निर्मित हा चित्रपट फक्त सिनेमाच्या सौंदर्यशास्त्रातच नाही, तर हॉलीवूडच्या बाजारपेठेतही नवीन आयाम दाखवून गेला. वाएट (पीटर फॉण्डा) आणि बिली (डेनिस हॉपर) हे दोन बाइकर कोकेन विकून कमावलेल्या पैशांतून अमेरिकन दक्षिण-पश्चिमेतून प्रवास करताना दिसतात. या प्रवासात त्यांना भेटणारे लोक, त्यांचा वेगवेगळा जीवनदृष्टी कोन, स्वातंत्र्याची ओढ आणि त्याचबरोबर अमेरिकन समाजात पसरलेलं दांभिकतेचं सावट या सर्वाचा आलेख चित्रपटात एकवटलेला आहे.

‘इझी रायडर’चा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची रचना. रोड ड्रामा हा एक असा प्रकार आहे, ज्याद्वारे कथानकावर भर देण्यापेक्षा वातावरण, अनुभव आणि संस्कृतीचं निरीक्षण मांडायला अधिक वाव मिळतो. हा चित्रपट क्लासिक हॉलीवूडच्या ‘रचलेल्या’ (वाचाः कृत्रिम भासणाऱया), पटकथाप्रधान संरचनेच्या विरुद्ध उभा राहतो. इथे प्रवास हा केवळ कथा पुढे नेण्यासाठी वापरलेला घटक नाही, तर तो प्रवास म्हणजेच कथा आहे. प्रत्येक टप्प्यावर दिग्दर्शक अमेरिकेतील सांस्कृतिक पडझड दाखवतोः सामुदायिक जीवनाचा शोध घेत असलेली हिप्पी वसाहत, न्यायाच्या नावाखाली हिंस्त्रतेचा पुरस्कार करणारे समाजरक्षक आणि व्यक्तिस्वातंत्र्याची भयानक किंमत मोजावी लागणारे अमेरिकन नागरिक.

या चित्रपटाने न्यू हॉलीवूडच्या काही महत्त्वाच्या वैशिष्टय़ांना मूर्त रूप दिलं. पहिलं म्हणजे बजेट आणि निर्मितीप्रक्रियेतील क्रांती. अत्यंत कमी खर्चात तयार झालेल्या ‘इझी रायडर’ने सिद्ध केलं की, मोठे स्टुडिओ नसतानाही एक लहान टीम, लोकेशन शूटिंग आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून प्रेक्षकांना भिडणारा चित्रपट तयार होऊ शकतो. दुसरं म्हणजे संगीताचा अभिनव वापर. स्टुडिओत रेकॉर्ड केलेली मूळ गाणी वापरण्याऐवजी इथे लोकप्रिय रॉक गाणी थेट चित्रपटात बसवली गेली. ‘द बर्डझ्’चं ‘आय वॉजन्ट बोर्न टू फॉलो’ किंवा ‘स्टेपेनवुल्फ’चं ‘बॉर्न टू बी वाइल्ड’ यांसारखी गाणी फक्त पार्श्वसंगीत म्हणून नाही, तर कथानकाच्या भावविश्वाचा भाग म्हणून वापरली गेली. त्यामुळे हा चित्रपट एका सबंध पिढीचा सांस्कृतिक प्रतिध्वनी बनला.

परंतु, या सर्व आकर्षक प्रयोगांमागे निर्मितीतील प्रचंड अडचणी होत्या. दिग्दर्शक म्हणून डेनिस हॉपरचा अनुभव मर्यादित होता आणि त्याचा परफेक्शनिझम बऱयाचदा निर्मितीत सहभागी चमूला त्रासदायक ठरला. चित्रीकरणादरम्यानचे त्याचे संतापाचे झटके, सतत बदलणारे निर्णय आणि ढिसाळ कार्यपद्धती यामुळे निर्मिती जवळजवळ कोसळून पडण्याच्या टप्प्यावर गेली होती. इतकंच काय, तर संकलन प्रक्रियेतही हॉपरनं जवळजवळ डझनभर संकलक बदलले. न्यू हॉलीवूडचा प्रयोगशीलपणा केवळ सर्जनशीलतेपुरता मर्यादित नव्हता; तर तो धोकादायक, गोंधळलेला आणि कधीकधी अनियंत्रितही होता, हेही यातून दिसतं.

वास्तववादी मांडणी हा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे. रस्त्यावरची धूळ, लहान शहरांची उग्रता, सत्ताकेंद्रांची हिंसक प्रवृत्ती हे सर्व अशा पद्धतीनं दाखवलं आहे की, ते प्रेक्षकांना तडाखा बसावा. स्वातंत्र्याच्या शोधात निघालेल्या दोन बाइकर्सचा अमेरिकेच्या असहिष्णुतेत होणारा नाश ही केवळ पात्रांची कहाणी नसून संपूर्ण अमेरिकन ड्रीमवरचं प्रश्नचिन्ह आहे. ‘इझी रायडर’मधील वातावरण निर्मिती कितीही प्रभावी असली तरी कथानकातील शिथिलतादेखील स्पष्टपणे जाणवते. अनेक प्रसंग एखाद्या डॉक्युमेंटरीसारखे भासतात. हे प्रसंग रस्त्यावरचं आयुष्य कॅमेरात बंदिस्त करणारे, पण ठोस नाटय़मय प्रवाह गाठू न शकणारे आहेत. ही रचना मुक्त भासणारी असली तरी त्याकाळी ती अनेकांना विस्कळीत आणि कंटाळवाणी वाटत होती. शिवाय, स्त्राr पात्रांची अनुपस्थिती हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तरीही या सगळ्या मर्यादांसह ‘इझी रायडर’चं महत्त्व नाकारता येत नाही. हा चित्रपट स्टुडिओ सिस्टिमच्या ‘घडवून’ आणलेल्या, सुरक्षित पॅकेजच्या विरुद्ध उभा राहिला आणि तरुण प्रेक्षकांना हवे असलेले सिनेमे हे त्यांच्या वास्तवाशी संवाद साधणारे, त्यांच्या भाषेत व्यक्त होणारे असावेत, हे त्यानं दाखवून दिलं. ‘इझी रायडर’ने पुढे येणाऱया संपूर्ण दशकाचा एक ठाम सूर तयार केला, ज्यात नायक म्हणजे समाजाच्या काठावरचा, अपयशी किंवा बंडखोर व्यक्ती, आणि कथा म्हणजे एक अस्थिर, शोधमूलक प्रवास असे समीकरण ठरले.

तसं पाहिलं तर ‘इझी रायडर’ म्हणजे केवळ एक रोड-मूव्ही नाहीय; तर तो अमेरिकेच्या सत्तरच्या दशकात प्रवेश करणाऱ्या मनोवृत्तीचा रस्ता आहे. तो स्वातंत्र्याची मोहिनी दाखवतो, पण त्याचबरोबर त्या स्वातंत्र्याची प्रखर किंमतही दाखवतो. हॉपरचा किंचित गोंधळलेला, पण जिद्दी प्रयोग, फॉण्डाचा शांत, संयत आत्मविश्वास आणि सिनेमाला पिढीचा सांस्कृतिक आरसा बनवण्याची क्षमता या सर्वामुळे ‘इझी रायडर’ न्यू हॉलीवूडची एक अपरिहार्य घोषणा ठरला.

[email protected]