जास्त नोकरभरतीमुळे कर्मचारी कपात वाढली, एचआरच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

सध्या टेक कंपन्यासह अन्य मोठय़ा कंपन्यांमध्ये होत असलेल्या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्गांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. कंपन्या आर्टिफिशयल इंटेलिजेन्स (एआय)मुळे कर्मचारी कपात करत असल्याचा दावा अनेकांकडून केला जात असताना एका एचआरने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. या एचआरच्या म्हणण्यानुसार, कंपन्या आधीच भरमसाट नोकरभरती करतात. त्यामुळे ते कर्मचारी कपात करत आहेत, असा दावा या एचआरने सोशल मीडियावर केला आहे.

कोणतीही कंपनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय एका रात्रीत घेत नाहीत. ज्या कंपन्या नोकर कपात करत आहेत ते केवळ एआय ऑटोमेशनमुळे करत नाहीत. तर या नोकर कपातीला कर्मचारीसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. बरेच कर्मचारी प्रोसेसनुसार काम करत नाहीत. काही कर्मचारी ट्रेनिंग पूर्ण करत नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी कंपनीच्या टार्गेटवर असतात. अशा कर्मचाऱयांवर नोकरी जाण्याचा धोका जास्त असतो. तसेच काही कंपन्या ओव्हर हायरिंग म्हणजेच जास्तीची नोकर भरती करतात. कंपनीला किती लोकांची गरज आहे, हे न पाहता कर्मचारी भरती केली जाते. वेगवेगळी भूमिका पार पाडण्यासाठी नोकर भरती केली जाते. परंतु, कधी अशी वेळ येते की, कर्मचाऱयांची संख्या कमी करावी लागते. त्यावेळी कंपन्या बिनदिक्कतपणे नोकर कपात करतात, असे या एचएआरने म्हटले आहे.

ज्या कर्मचाऱयांची नोकरी जाणार असेल त्याला आधीच इशारा दिला जातो. त्याच्यावर अचानक जास्तीच्या कामाचा लोड दिला जातो. किंवा त्याच्या कामाची जबाबदारी अन्य कोणाला दिली जाते. त्या कर्मचाऱ्याला मीटिंग्स, प्रोजेक्ट्स किंवा महत्त्वाच्या चर्चेमधून बाहेर ठेवले जाते. मॅनेजरची वागणूक अचानक बदलते. कामात चुका काढायला सुरुवात होते. प्रमोशन किंवा पगारवाढ थांबवली जाते.