
ओबीसींना नाराज कराल तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत होईल. तुम्ही आपलं मताधिक्य राखण्यात कमी पडाल, असा हल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी नाव घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ‘यात माझं काय चुकलं?’, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
बीड येथील ओबीसींच्या महाएल्गार सभेत भाजपाला इशारा दिल्यानंतर शनिवारी येवला येथे भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. मराठा-ओबीसी आरक्षणावरून ते म्हणाले की, ओबीसींनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्यानेच भाजपा, महायुती अतिशय पुढे आली. भाजपाचा डीएनए ओबीसीच आहे असे एकीकडे म्हणायचे आणि अशा रीतीने जीआर काढायचे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परत परत जाऊन ओबीसींना नाराज केल्याचे परिणाम उद्याच्या निवडणुकांत होतील.
देवेंद्र फडणवीस, तुम्ही आपलं मताधिक्य राखण्यात कमी पडाल, असा महायुतीला घरचा आहेर दिला. पूर्वीची महायुतीची ताकद कायम ठेवायची असेल तर पुन्हा सगळ्यांना बरोबर घेऊन वाट काढावी लागेल. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये, असा इशाराही दिला. भाजपाची शक्ती ओबीसींना सोबत घेऊन वाढेल की दूर करून वाढणार आहे, असा सवाल करीत विखे पाटील यांच्यावरही टीका केली.