
बिहार विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पहिला टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागांबाबत एकमत झालेले नाही. यामुळे पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी महाआघाडीच्या 125 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. काँग्रेस-राजद उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध काही ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत. जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेस नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून मध्यस्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
महाआघाडीत जागांसाठी सुरू असलेला संघर्ष अद्याप सुटलेला नाही. राजदने उमेदवारांची एकही यादी जाहीर न करताच थेट उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने 48 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर सीपीआयएमएलने 18 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाआघाडीतील घटक पक्षांनी आत्तापर्यंत 10 जागांवर एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि राजदने पाच जागांवर एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात राजदचा उमदेवार
काँग्रेससाठी लोकप्रिय असलेल्या कुटुम्बा येथून प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे उमेदवार आहेत. आरजेडीने सुरेश पासवान यांना येथून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत होण्याचे संकेत सुरेश पासवान यांनी दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या 121 जागांसाठी महाआघाडीकडून राजदने 72, काँग्रेसने 24, डावे 21, व्हीआयपीने 3 आणि आयआयपीने 2 जागांसाठी अर्ज दाखल केले आहेत.