IND vs AUS – विराट शून्य, रोहित आठ धावांवर बाद; 223 दिवसानंतर कमबॅक, पण अर्ध्या तासात पॅकअप

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात रविवारपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना पर्थच्या ऑप्टस मैदानावर सुरू आहे. या लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्यांदा मैदानात उतरल्याने त्यांच्या कामगिरीवर लक्ष्य होते. मात्र दोघेही पहिल्या लढतीत फ्लॉप ठरले. विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही, तर रोहित शर्मा आठ धावांवर बाद झाला.

हिंदुस्थानकडून रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल सलामीला आले. रोहितने एक चौकार ठोकून सुरुवात चांगली केली, मात्र चौथ्या षटकात तो बाद झाला. जोश हेझलवूड याने त्याला 8 धावांवर बाद केले. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. सुरुवातीपासूनच चाचपडून खेळणारा विराट ऑफ स्टंप बाहेरच्या चेंडूवर बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला भोपळाही फोडू दिला नाही.

रोहित-विराट बाद झाल्यानंतर गिलही (10 धावा) नाथन एलिसच्या चेंडूवर फिलिप्सकडे झेल देऊन बाद झाल्याने हिंदुस्थानची अवस्था 3 बाद 25 अशी बिकट झाली. सुदैवाने वरुणराजा धावून आल्याने सामन्याला ब्रेक लागला. पावसामुळे खेळ थांबवला तेव्हा हिंदुस्थानच्या 11.5 षटकात 37 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यर 6, तर अक्षर पटेल 7 धावांवर खेळत होता.