शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज – शरद पवार

देशभरात दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके वाहून गेली, तर काही ठिकाणी शेतजमीन पाण्याखाली गेली. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना धीर देत संकटावर मात करून पुढे जाण्याचे आवाहन केले.शरद पवार म्हणाले, “संकटे येतातच, पण त्या संकटांवर मात करून पुढे जाणे, नवीन संधी शोधणे आणि शेतीला नवीन दिशा देणे हेच खरे ध्येय असले पाहिजे. आजच्या काळात तंत्रज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही. आगामी काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे. शेतकऱ्यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, तर शेतीत उत्पादनवाढ आणि खर्चात बचत दोन्ही साधता येईल.

अहिल्यानगर येथील श्री अंबिका विद्यालय केडगाव देवी या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होत, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य दादा कळमकर, खासदार निलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार आशुतोष काळे, काँग्रेसचे जयंत वाघ, सर्जेराव निमसे, जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, सचिव चंद्रकांत दळवी, बाबासाहेब भोस,माजी आमदार राहुल जगताप,अनिल पाटील, अभिषेक कळमकर, भानुदास कोतकर, अंबादास गारूडकर, आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, “हे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. जगात दररोज नवीन तंत्रज्ञान येत आहे. औद्योगिक क्षेत्र असो, कृषी क्षेत्र असो वा आरोग्य क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या प्रवाहात सामील होणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन पिढीला आपण या दिशेने तयार केले पाहिजे, त्यांना या तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले पाहिजे असे म्हणाले.