Dapoli News – कार्तिकि उपवासाच्या 15 दिवस आधीच दापोलीत कणगरांची विक्री सुरू

दापोली बाजारपेठेत दर वर्षी कार्तिकी एकादशी उपवासाच्या दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी महिला कणगर विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र यावर्षी पंधरा दिवस आधीच कणगर विक्रिसाठी दाखल झाले आहेत. त्यांचा खपही मोठ्या प्रमाणात होत आहे.

उपवासाच्या दिवशी कणगर उकडून खाल्ले जाते. कंदांतील सर्वात पौष्टिक कणगरचा कंद. कोकणात हा पावसाळ्यात अनेक ठिकाणी शेतकरी उत्पादन घेण्यासाठी म्हणून लावतात. कणगरला पांढरी रताळी असेही म्हणतात. हे कंद मातीत झुबक्याने लागतात. ते आकाराने लांबट गोल असून त्यावर थोडेसे उंचवटे असतात. एका कणगरचे वजन अंदाजे 100 ते 150 ग्रॅम असते. हे उकडून किंवा चुलीतील राखेत भाजून खातात. आजारातून उठलेल्या व्यक्तीस ताकद येण्यासाठी हा कंद खायला दिला जातो.

दापोलीत खेडेगावात शेतीबरोबरच कणगराची लागवड घरामागील परसात अथवा तरवा तयार करुन केली जाते. त्या कणगराचे उत्पादन हे दापोली बाजार पेठेत विक्रीसाठी आणले जाते. एरव्ही कणगराचा खप तेवढा होत नसला तरी उपवासानिमित्त कणगरांची विक्रि मोठ्या प्रमाणात होते तसे कार्तिकी एकादशीच्या उपवासाच्या आदल्या दिवशी दापोली तालुक्यातील विविध ठिकाणच्या गावागावातून दापोली बाजारपेठेत विक्रि करिता दरवर्षी मोठ्या प्रमाणात कणगर आणले जातात मात्र बदलत्या वातावरणामुळे यावर्षी कणगर तयार झाली असून कार्तीकी एकादशी च्या आधीच विक्रेत्यांनी आणलेल्या कणगरांची विक्रि प्रती किलो 140 रुपये दराने विक्री सुरू आहे. नव्याची नवलाई आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कंदमुळं म्हणून कणगरांची विक्रि हातोहात होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून कणगर घेऊन दापोलीत विक्रि करिता आलेल्या कणगर विक्रेत्यांच्या चेह-यावर मात्र चांगलेच समाधानाचे भाव पाहायला मिळतात.