
राज्यातील महायुती सरकारला सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट वारकरी आघाडीच्या वतीने सोमवारी देहू येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार, वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे पाटील हे लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत. यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
‘वंदे भारत’ला तब्बल सहा तासांचा विलंब
दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रविवारी ‘वंदे भारत’च्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप सहन करावा लागला. गाडी क्रमांक 20706 सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत नियोजित वेळेच्या तब्बल सहा तास उशिराने धावली. सीएसएमटीवरून दुपारी 1.10 वाजता वंदे भारत सुटणार होती. परंतु, काही कारणास्तव ही ट्रेन सायंकाळी 7.30 वाजता सुटण्याचे नियोजित केले. याबाबतची माहिती प्रवाशांना सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आली. ऐनवेळी गाडीच्या वेळेत बदल केल्याने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन बदलण्यासाठीही वेळ मिळाला नाही.
मेधा कुलकर्णीवर गुन्हा नोंदवा -रूपाली पाटील
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेवर अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, पुण्यात भाजपने मेघा कुलकर्णी यांना आवर घालावा. शनिवारवाडा कुणाच्या बापाचा नाही. शनिवारवाडा मराठा साम्राज्यातील पेशव्यांचा आहे. पुणेकरांचा आणि सर्व जाती धर्माचा आहे. शहरातील हिंदू-मुस्लिम समाजातील वातावरण मेधा कुलकर्णी खराब करत आहेत. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत. खासदार असल्याचे त्या विसरल्या आहेत का? असा सवाल रूपाली पाटील यांनी केला. कोथरूडमध्ये नाटकं झाली आता कसब्यात येऊन हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहे. त्याबद्दल मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.