मुद्दा – प्रदूषणमुक्त दिवाळी

>> सुनील कुवरे

दिवाळीचा सण हा वसुबारसपासून सुरू होतो. नंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा, भाऊबीज अशी पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. या दिवसांत लोक आपली घरे पणत्या, रोषणाई, रांगोळी, पंदील लावून सजवतात. फटाके लावून आपला आनंद द्विगुणित करतात. हे पाच दिवस केवळ आणि केवळ समाधान व आनंदाचे दान देणारे ठरतात. परंतु गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या कालावधीत मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषणात मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. आपल्या देशात चिनी फटाक्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. जे फटाके अत्यंत कमी दर्जाच्या रसायनांचा वापर करून तयार केलेले असतात ते फार घातक असतात. त्यात मोठय़ा आवाजाचे फटाके वाजवण्यावर न्यायालयाने काही बंधने घातली आहेत. हवामान, ऋतुमान बदलत आहे त्याला प्रदूषण कारणीभूत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातच वाहनांच्या प्रदूषणाची समस्या आहेच. त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना जास्त त्रास होतो. श्वसनाचे विकार वाढतात. सर्वसाधारणपणे 80 ते 85 डेसिबल ध्वनी प्रदूषणाची पातळी असते. दिवाळीत 125 डेसिबलपर्यंत जाते, तर फटाक्यांमुळे पीएम 2.5 ही प्रदूषके मोठय़ा प्रमाणात वाढतात. मानसिक आजारांसोबत श्वसनाचे विकार निर्माण होतात.

जवळपास कोटय़वधी रुपयांच्या फटाके विक्रीची उलाढाल होते.  आवाजांच्या फटाक्यापेक्षाही रोषणाईचे फटाके वापरण्याकडे कल दिसत असला तरी या कालावधीमध्ये ध्वनी आणि प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठलेली आहे. दिवाळीचा सण आणि फटाक्यांचे नाते असल्यामुळे त्यातून संपूर्णपणे बाहेर येण्याची मानसिकता अद्याप तयार झालेली नाही. दिवाळी सण आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. दिवाळीत फटाके पह्डणे म्हणजेच दिवाळी साजरा करणे असे समजण्याचे कारण नाही.