
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर आज लक्ष्मी प्रसन्न झाली. परंपरेनुसार दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणारे मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र उत्साहात पार पडले. शुभमुहूर्त साधत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित वधारले. आजच्या तेजीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराने (निफ्टी) वर्षभरातील उच्चांक गाठला. त्याचा फायदा लाखो गुंतवणूकदारांना झाला.
मुहूर्ताचे ट्रेडिंग दुपारी 1.45 वाजता सुरू झाले. ते 2.45 वाजेपर्यंत सुरू होते. मुहूर्ताच्या ट्रेडिंगला खरेदी जास्त प्रमाणात अपेक्षित असते, मात्र बाजार उघडताच सेन्सेक्स व निफ्टी वधारल्याने अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे अवघ्या तासाभरात सेन्सेक्स, निफ्टीमध्ये बरेच चढउतार पाहायला मिळाले. आजच्या तासाभरातील उच्चांकावरून सेन्सेक्स 250 अंकांनी खाली आला तर इंट्रा-डेमध्ये निफ्टी 66 अंकांनी घसरला. शेवटी सेन्सेक्स 62.97 अंकांनी वधारून 84,426.34 वर बंद झाला तर निफ्टी 25.45 अंकांनी चढून 25868.60 च्या पातळीवर स्थिरावला.
सर्वाधिक वधारले!
सिप्ला, बजाज फिनसर्व, ऑक्सिस बँक, इन्पहसिस, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज लॅब, बजाज फायनान्स.
सर्वाधिक घसरले!
कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, मॅक्स हेल्थकेअर, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, इंडिगो, टीसीएस, ओएनजीसी, ट्रेंट.
ट्रम्प सरकारचा खुलासा पथ्यावर
एचन-1 बी व्हिसाच्या नूतनीकरणास ट्रम्प सरकारने दिलेल्या शुल्कमाफीचा परिणाम आज बाजारात दिसला. आयटी कंपन्यांचा निर्देशांक किंचित वधारला. सर्वाधिक फायदा इन्पहसिसच्या शेअरला झाला. हा शेअर 0.79 टक्के वाढीसह टॉप गेनर ठरला.