लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच जनता सगळं पाहतेय, लक्षात ठेवतेय असा इशाराही त्यांनी दिला.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, बोगस लाभार्थ्यांनी सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची बातमी ऐन दिवाळीत बाहेर येतेय. सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? योजनांच्या नावांआड जनतेच्या पैश्यांवर डल्ला मारायचा आणि सरकारी तिजोरी रिकामी करायची ही तर भाजपा-मिंधेंची जूनी खोड आहे. मुंबई महानगरपालिकेतही तेच सुरु आहे.

त्याचवेळी दुसरीकडे ऐन दिवाळीत आपले शेतकरी बांधव, आपला बळीराजा मदतीविना अंधारात आहेत. अतीवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं फक्त खोटं आश्वासन मिळालं, पण हाती काही पडलं नाही. पण सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, जनता सगळं पाहतेय, लक्षात ठेवतेय. असेही आदित्य ठाकरे म्हणाले.