बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवरून उतरवणं हेच महायुतीचं अंतिम ध्येय, म्हणून इथे ते एकत्र लढायला तयार; संजय राऊत यांचा घणाघात

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवरून उतरवणे हेच महायुतीचे अंतिम ध्येय आहे. म्हणून इथे ते एकत्र लढायला तयार आहे. पण मुंबईच्या बाहेर नाहीत. भविष्यात ही मुंबई अमित शहा आणि त्यांच्या कंपन्या अदानीला द्यायला सज्ज झाल्या आहेत, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांवेळी मुंबईत महायुती एकत्र लढणार असे विधान केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत उत्तर देत होते.

मुंबईत एकत्र आणि ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे वेगवेगळे लढण्याबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हा त्यांच्या गटाचा निर्णय आहे. पण या सगळ्यांचे लक्ष मुंबई आहे. मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. बाकी इतरत्र नाही. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवणे म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणे या विषयी त्यांच्यात एकमत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भगवा झेंडा कायम मुंबईवर फडकवत ठेवला तो उतरवणे हे यांचे अंतिम ध्येय आहे आणि त्याच्यामुळे ते इथे एकत्र यायला तयार आहेत.

लोकसभा निवडणुकीतील मतदार याद्यांतील घोटाळे बाहेर काढून विरोधकांवर बॉम्ब टाकणार असेही भडणवीस म्हणाले. याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. तुम्ही मुख्यमंत्री असून घोटाळे बाहेर काढा असे आव्हान राऊत यांनी दिले. चोराला चोराचे दरवाजे माहिती असतात. हे तर चोरांचे सरदार आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केले. तसेच आम्हाला कसल्या धमक्या देताय, आम्हीच तुमचे घोटाळे पुराव्यांसह बाहेर काढले. आता या गमज्या बंद करा, असेही राऊत म्हणाले.

मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण; ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी, हे काँग्रेसनं समजून घ्यावं! – संजय राऊत

2029 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार असून त्यानंतर दिल्लीचे बघू, असेही फडणवीस म्हणाले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, हो पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे. जर मोदी पंतप्रधानपदी राहू शकले तर या महाराष्ट्रातल्या राजकारणाचे जे गणित मांडताहेत ते असेल. माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असते. महाराष्ट्रातले बहुमत हे खरे बहुमत नाही. स्वत: फडणवीस यांना शिंदेंचा आणि अजित पवारांचाही पक्ष फोडायचा आहे. त्याचे भूगर्भातील धक्के सुरू झाले आहे. फडणीसांना स्वयंभू राज्य करायचे आहे आणि त्यासाठी भाजप व फडणवीसांचा भाजपमधील गट हे कोणतीही भूमिका घेऊ शकतात.

दरम्यान, पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर यांच्या सुरू असलेल्या संघर्षावरही राऊत यांनी भाष्य केले. अलीकडच्या काळात भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आलेला आहे. हा संघर्ष मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भाजपमधील एक गट आहे. धंगेकर हा मोहरा आहे. धंगेकरांना मालमसाला पुरवणारे हात वेगळे आहेत. धंगेकरांचे बोलवते धनी सरकारमध्ये बसले आहेत, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.