
दिवाळीत दरवर्षी वेगवेगळ्या फटाक्यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. यंदाच्या दिवाळीत कार्बाइड गन म्हणजेच देशी बंदुकीची क्रेझ पाहायला मिळाली. परंतु, कार्बाइड गन अनेक चिमुकल्यांच्या जीवावर बेतली. मध्य प्रदेशात कार्बाइड गनमुळे 14 मुलांनी कायमची दृष्टी गमावली आहे. तर अवघ्या तीन दिवसात एकटय़ा मध्य प्रदेशात 122 हून अधिक मुलांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
मध्य प्रदेशातील विदिशा जिह्यात या घटना घडल्या आहेत. सरकारने कार्बाइड गन्सवर बंदी घातलेली असताना याची विक्री करण्यात आली. 150 ते 200 रुपये किंमतीत ही कार्बाइड गन विकली गेली. या गनचा स्फोट एखाद्या बॉम्ब प्रमाणे होते. त्यामुळे ते अत्यंत धोकादायक आहे. आम्ही घरी बनवलेली कार्बाइड गन विकत घेतली. या बंदुकीचा स्फोट झाल्यानंतर माझा एक डोळा पूर्ण भाजला. मला काहीच दिसत नाही, असे अवघ्या 17 वर्षीय नेहाने सांगितले. गंभीर दुखापत झाल्यानंतर तिच्यावर हमिदीया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज विश्वकर्मा नावाच्या पीडित मुलाने सांगितले की, मी सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिले आणि घरीच फटाक्यांची ही बंदूक बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती बंदूक माझ्या चेहऱ्यासमोरच फुटली त्यामुळे मला एक डोळा गमवावा लागला आहे. केवळ भोपाळच्या हमिदिया रुग्णालयात 72 तासांत 36 मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या उपकरणामुळे थेट डोळ्य़ांना इजा होते. डोळ्यातील रेटिना जळतो, असे हमिदीया रुग्णालयातील डॉ. मनीश शर्मा यांनी सांगितले.
सहा जणांना अटक
कार्बाइड गनची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी विदिशा पोलिसांना आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेर येथील रुग्णालयांमध्ये या कार्बाइड गनमुळे डोळ्यांना दुखापत झालेल्या तरुण मुलांनी संपूर्ण वॉर्ड भरले आहेत.
रील्समधून व्हिडीओ व्हायरल
लहान मुलांनी प्लॅस्टिक किंवा टिन पाइपचा वापर करून ही कार्बाइड गन बनवली. या पाइपमध्ये गनपावडर, काडीपेटीच्या काडय़ांचे डोके आणि कॅल्शियम कार्बाइड भरले जाते. ते एका छिद्रातून पेटवले जाते. यामुळे याचा आवाज मोठा येतो. परंतु, स्फोटातून बाहेर पडणाऱ्या पदार्थामुळे थेट चेहरा आणि डोळ्यांना दुखापत होते. यासंबंधीचे व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या रील्स आणि यूटय़ूबमधून व्हायरल झाल्याने ते अनेकांनी बनवले.

























































