
लडाखमध्ये गलवान खोऱ्यामध्ये काही वर्षांपूर्वी घुसखोरी करणाऱ्या चिनी ड्रगनच्या कुरापती सुरूच असून आता चीन नियंत्रण रेषेनजिक पँगाँग सरोवराजवळ एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स उभारत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हिंदुस्थानने उपग्रहाद्वारे टिपलेल्या छायाचित्रांमधून चीनचे हे नवे कारस्थान समोर आले आहे.
चीनने गलवान खोऱ्यात केलेल्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हा तणाव अद्याप निवळलेला नसताना आता चीनने पुन्हा हिंदुस्थानला डिवचण्यास सुरुवात केली आहे. पँगाँग सीमेजवळ चीन एक नवा एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स उभारत आहे. हे ठिकाण 2020 मध्ये हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाच्या ठिकाणापासून 110 किमी अंतरावर आहे. या पह्टोंमध्ये काही मिसाईल लाँच पोझिशनमध्ये असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात हिंदुस्थान सरकार चीनच्या या कुरापतीला कसे उत्तर देते, कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नियंत्रण रेषेपासून फक्त 65 किमी अंतरावर
चीनचे हे एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स नियंत्रण रेषेपासून फक्त 65 किमी अंतरावर आहे. शिवाय हिंदुस्थानच्या अॅडव्हान्स न्योमा हवाई तळाच्या अगदी समोर आहे. इतर स्पेस इंटेलिजन्स एजन्सी व्हेंटरच्या स्वतंत्र संकेतस्थळावरील पह्टोमध्ये हे संशयास्पद मिसाईलचे छप्पर दिसत आहे.
हल्ल्यासाठी तयार मिसाईल, मोठी पायाभूत रचना
चीनकडून सुरू असलेल्या या बांधकामामध्ये अत्याधुनिक मिसाईल हल्ला करण्यासाठी तयार असल्याच्या पोझिशनमध्ये झाकून ठेवलेल्या स्थितीमध्ये दिसत आहेत. संरक्षण तज्ञांच्या मते या भक्कम शेल्टरमध्ये चीनच्या लाँग रेंज एचक्यू-9 सफरफेस टू एअर मिसाईल ठेवण्यात आल्या आहेत. एअर डिफेन्सच्या क्षमतेमध्ये हे मिसाईल महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या कॉम्प्लेक्सचे बांधकाम पँगाँग लेकच्या साईटवर सुरू आहे.





























































